वाशिम जिल्ह्यात कोरोना लसीकरणची रंगीत तालीम यशस्वी

 


·        विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडून लसीकरण केंद्राची पाहणी

वाशिम, दि. ०८ : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज जिल्ह्यात वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा उपजिल्हा रुग्णालय आणि शेलूबाजार प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) घेण्यात आली. तिन्ही ठिकाणी घेण्यात आलेली लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वी झाला. अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील लसीकरण केंद्राला भेट देवून लसीकरण रंगीत तालीम कार्यवाहीचा आढावा घेतला.

याप्रसंगी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांची उपस्थिती होती.

लसीकरणाच्या रंगीत तालमीसाठी प्रत्येक लसीकरण केंद्रावर २५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार त्यांना मोबाईलवर मेसेज पाठवून कळविण्यात आले. सदर लाभार्थी लसीकरण केंद्रावर आल्यानंतर त्याच्या नावाची ‘कोवीन’ अॅपवर पडताळणी करणे, ओळख पटविणे, लसीकरण करणे आणि त्यानंतर त्याला निरीक्षणात ठेवणे आदी संपूर्ण कार्यवाही शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पाडण्यात आली. या सर्व टप्प्यांवर करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची विभागीय आयुक्त श्री. सिंह आणि जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी माहिती घेतली. तसेच लसीकरण केंद्रावरील प्रतीक्षालय, लसीकरण कक्ष, निरीक्षण कक्षाची पाहणी केली.

आज जिल्ह्यात तीन लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी २५ प्रमाणे एकूण ७५ कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याची रंगीत तालीम घेण्यात आली. त्यासाठी प्रत्येक लसीकरण केंद्रावर पाच जणांचे पथक नियुक्त करण्यात आले होते. लसीकरणाच्या अनुषंगाने आजपर्यंत झालेल्या प्रशिक्षणानुसार व मार्गदर्शक सूचनांनुसार सर्वांनी ‘कोवीन’ अॅपचा वापर करून लसीकरणाची रंगीत तालीम घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार तिन्ही ठिकाणी लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वी झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी दिली.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे