वाशिम जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात

 




 


वाशिम, दि. १६ : कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेस आजपासून प्रारंभ झाला असून जिल्ह्यातही या मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. वाशिम येथे आमदार लखन मलिक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या उपस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कर्मचारी पूनम सराफ यांना लस देवून लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, डॉ. उमेश मडावी, डॉ. राजेश पवार, डॉ. संदीप हेडाऊ, डॉ. लक्ष्मीकांत राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरणराव सरनाईक यांनीही वाशिम येथील लसीकरण केंद्राला भेट देवून लसीकरणाच्या कार्यवाहीची पाहणी केली.

पहिल्या दिवशी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा उपजिल्हा रुग्णालय आणि मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालय या तीन ठिकाणी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली. केंद्र शासनाच्या दिशानिर्देशानुसार कोरोना लसीकरण केंद्रांवर सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी १०० आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आले. या सर्वांना एक दिवस अगोदर मोबाईलवर संदेश पाठवून लसीकरण मोहिमेला उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले.

लसीकरण केंद्रावर आल्यानंतर संदेश प्राप्त झालेल्या व्यक्तींची नोंदणी, त्यांचे शरीर तापमान तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना बसण्यासाठी प्रतीक्षा कक्षाची व्यवस्था करण्यात आली. लसीकरण कक्षात सदर व्यक्तींची ओळख पटविणे, त्याच्या नावाची पडताळणी झाल्यानंतर लसीकरण करण्यात आले. लसीकरणानंतर त्यांना ३० मिनिटे निरीक्षण कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात आले, या दरम्यान कोणताही त्रास न जाणवल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले.  कोरोना लसीकरण मोहिमेच्या शुभारंभानिमित्त वाशिम येथील लसीकरण केंद्रावर सुशोभीकरण करण्यात आले होते. तसेच याठिकाणी रांगोळी रेखाटून कोरोना लसीकरणाचे महत्व पटवून देण्यात आले.

सर्वप्रथम लस घेतलेल्या पूनम सराफ यांनी व्यक्त केला आनंद

कोरोना लसीकरण मोहिमेतील प्रथम लाभार्थी ठरलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कर्मचारी पूनम सराफ यांनी लस मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, गेल्या काही महिन्यांपासून आम्ही जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कोरोना बाधितांवर उपचार करीत आहोत. या आजारावर आलेली लस घेतल्याचा आनंद होत आहे. तसेच ही लस सुरक्षित असून त्याचा कोणताही त्रास जाणवला नाही. त्यामुळे इतर आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांनी सुद्धा लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे