‘कोरोना’ची लस सुरक्षित, कोणताही त्रास जाणवला नाही !
· लस टोचून घेतलेल्या कोरोना योद्ध्यांशी संवाद
·
विषाणू
संसर्ग टाळण्यासाठी सर्वांनी लस घेण्याचे आवाहन
वाशिम, दि. १९ : कोरोना विषाणू संसार्गाला
रोखण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला शनिवारपासून प्रारंभ झाला आहे.
वाशिम जिल्ह्यातही तीन ठिकाणी ही मोहीम सुरु झाली आहे. या मोहिमेंतर्गत वाशिम
जिल्हा सामान्य रुग्णालय येथील लसीकरण केंद्रात आज, लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी
संवाद साधला असता, त्यांनी ही लस सुरक्षित असल्याचे सांगितले. तसेच लस टोचून
घेतल्यानंतर कोणताही त्रास जाणवला नाही, कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी लस घेणे
आवश्यक असून सर्वांनी लस घेण्याचे आवाहनही केले.
वाशिम
जिल्हा सामान्य रुग्णालयातील क्ष-किरण तज्ज्ञ डॉ. विश्वनाथ बगाटे यांनीही आज लस
घेतली. लस घेतल्यानंतर त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, गेल्या आठ-नऊ
महिन्यांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये आम्ही काम करीत आहे.
कोरोना बाधितांवर उपचार करीत असताना मनोमन वाटत होते की, या आजारावरील लस लवकर
यावी. कोरोना लसीकरण सुरु झाल्यानंतर लस घेण्यासाठी मी उत्सुक होतो, लसीकरणासाठी
मला काल संदेश मिळाला. त्यानुसार आज मी लस टोचून घेतली आहे.
लस
टोचल्यानंतर ३० मिनिटे निरीक्षण कक्षात मला निगराणीखाली ठेवले, मात्र मला कोणताही
त्रास जाणवला नाही, त्यामुळे मला घरी पाठविण्यात आले. ही लस विविध चाचण्यांमध्ये
यशस्वी झाल्यानंतरच तिला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे मनात कोणतीही
भीती न बाळगता मी लस घेतली आहे. आता एक महिन्याने लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर १४
दिवसांनी माझ्या शरीरात कोरोना विरुद्धच्या ‘अँटिबॉडीज’ तयार होतील. त्यामुळे माझा
कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव होण्यास मदत होईल, असे डॉ. बगाटे यांनी सांगितले.
अनसिंग
ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारिका प्रज्ञा अशोक भगत यांनीही आज लस घेतली. यावेळी
आपले अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, रुग्णालयात येणाऱ्या विविध आजारांच्या
रुग्णांवर उपचार करताना आमचा संपर्क येतो. यामध्ये एखादा कोरोना संसर्ग झालेला
रुग्ण आला तर त्यापासून आपल्यालाही संसर्ग होवू शकतो, अशी भीती मनात राहत असे. आता
कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणारी लस आली असून ती सर्वप्रथम आम्हा आरोग्य
कर्मचाऱ्यांना मिळत आहे. ही लस घेतल्यामुळे रुग्णालयात काम करतांना कोरोना विषाणू
संसर्गाची शक्यता कमी होणार आहे. त्यामुळे मी आज ही लस घेतली आहे.
१६
जानेवारी रोजी माझ्या काही मैत्रिणींनी लस घेतली होती, त्यांना या लसीकरणामुळे
कोणताही त्रास झाला नाही. त्यांच्याशी चर्चा केल्यामुळे या लसीविषयी माझ्या मनात
कोणतीही भीती राहिली नाही. आज मी लस घेतल्यानंतर मला सुद्धा कोणताही त्रास जाणवला
नाही. ही लस सुरक्षित असून त्याचे कोणतेही वाईट परिणाम होत नाहीत. सर्वांनी ही लस
घेवून आपला कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव करावा, असे प्रज्ञा भगत यांनी यावेळी
सांगितले.
*****
Comments
Post a Comment