‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत पर्यावरण संवर्धन उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढवा - विभागीय आयुक्त पीयूष सिंह
वाशिम, दि. ०८ (जिमाका) : पर्यावरण संवर्धन व रक्षणासाठी नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, उपक्रमांमध्ये स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सहभाग वाढवावा, अशा सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिल्या. अभियानाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत
परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, अपर जिल्हाधिकारी शरद पाटील, निवासी
उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी सुनील विंचनकर यांची प्रमुख उपस्थिती
होती. विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी यावेळी अभियानाचा नगरपरिषद, नगरपंचायत
निहाय आढावा घेतला.
श्री. सिंह म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी
शहरी भागातील संपूर्ण घनकचऱ्याचे संकलन, विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया होणे
आवश्यक आहेत. तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया होणे गरजेचे असून जिल्ह्यातील सर्व
नगरपरिषद व नगरपंचायतींनी त्यादृष्टीने नियोजन करावे. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग,
वृक्ष लागवड, ऑक्सिजन पार्कची निर्मिती आदी उपक्रम हाती घ्यावेत. शहरांमधील सर्व
शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, व्यापारी संकुल व सर्व खासगी इमारतींमध्ये
रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा करून ती कार्यरत राहील, याची दक्षता घ्यावी. आगामी
पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा सुरु
होईल, यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड,
नगरपरिषद उद्यानांमध्ये ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यासाठी स्वयंसेवी संस्था,
स्थानिक नागरिकांची मदत घेवून त्यांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहित करावे. तसेच
वृक्ष लागवड केल्यानंतर त्यांच्या संगोपनासाठी सुद्धा सूक्ष्म नियोजन करावे. शहरी
भागात हरित आच्छादने व जैवविविधता निर्माण करण्यासाठी भारतीय प्रजातीच्या जास्तीत
जास्त झाडांची लागवड करावी, असे सांगून श्री. सिंह म्हणाले, शहरी भागामध्ये बंदी
घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होवू नये, यादृष्टीने कार्यवाही करावी. अशा
प्रकारे प्लास्टिक पिशवीची विक्री अथवा वाहतूक होत असल्यास दंडात्मक कारवाई
करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
कोरोना संसर्ग
सद्यस्थितीचा आढावा
विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश
आहेर यांच्याकडून कोरोना संसर्ग सद्यस्थितीचाही आढावा घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत
७५ हजार ५७५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती डॉ. आहेर यांनी यावेळी दिली.
तसेच जिल्ह्यात सध्या १०९ कोरोना बाधित असून यापैकी ३७ बाधित संस्थात्मक अलगीकरणात
असून उर्वरित सर्व बाधित गृह अलगीकारणात असल्याचे सांगितले. कोरोना लसीकरण मोहिमेत
पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावाही श्री. सिंह
यांनी यावेळी घेतला. तसेच जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची संख्या कमी होऊ न
देण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला केल्या.
विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी
यावेळी महसूल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत महसुल वसुली, ई-फेरफार नोंदणी, ई-क्यूजे
प्रणालीचा वापर आदी विषयांचा आढावा घेतला. यावेळी वाशिमचे उपविभागीय अधिकारी
प्रकाश राऊत, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक मोरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर
तोटावार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, जिल्हा अधीक्षक भूमी
अभिलेख श्री. इंगळी, सर्व तहसीलदार, नगरपरिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यावेळी
उपस्थित होते.
Comments
Post a Comment