प्रत्येक जिल्ह्यात महिला व बाल विकास भवन उभारणार - ॲड. यशोमती ठाकूर
·
महिला
व बाल विकास विभागाच्या योजनांचा आढावा
·
पोषण
आहार नियमितपणे घरपोच वाटप करा
वाशिम, दि. ०८ (जिमाका) : महिला व बाल विकास विभागाच्या
अंतर्गत असलेली सर्व जिल्हास्तरीय कार्यालये एकाच छताखाली आणून महिला व बालकांच्या
विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यासाठी प्रत्येक
जिल्ह्यात महिला व बाल विकास भवन उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन ॲड. यशोमती
ठाकूर यांनी केले. पथदर्शी प्रकल्प म्हणून वाशिम जिल्ह्यात जिल्हा वार्षिक
योजनेतून हे भवन उभारण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद सभागृहात
महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या आढावा बैठकीत आज,
८ जुलै रोजी त्या बोलत होत्या.
यावेळी
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, समाज कल्याण
सभापती वनिता देवरे, महिला व बालकल्याण सभापती शोभा गावंडे, बांधकाम सभापती विजय
खानझोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, जिल्हा महिला व बाल विकास
अधिकारी सुभाष राठोड, ‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, ‘नाबार्ड’चे
जिल्हा व्यवस्थापक विजय खंडरे, ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता
निलेश राठोड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ॲड.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या, महिला व बाल विकासासाठी शासनामार्फत विविध योजना
राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेचा महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा महिला व
बाल विकास अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ यासारख्या विविध कार्यालयांच्या
माध्यमातून जिल्हास्तरावर या योजनांची अंमलबजावणी होते. ही सर्व कार्यालये एकाच
छताखाली आल्यास महिलांना योजनांचा लाभ घेणे अधिक सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे
राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास भवन उभारण्याचा प्रयत्न
असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला आयोगाचे केंद्र
सुरु करण्याबाबत सुध्दा प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात
पूरक पोषण आहाराचे नियमितपणे घरपोच वितरण करावे. याबाबतीत कोणतीही तक्रार येणार
नाही, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एक रक्कमी
लाभाचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे ॲड. श्रीमती
ठाकूर यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यात व्हाटसअप ग्रुपच्या सहाय्याने सुरु
असलेले पूर्व प्राथमिक शिक्षणाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी
सांगितले.
Comments
Post a Comment