मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते ‘तेजश्री’ योजनेच्या धनादेशांचे वितरण





·        ‘ई-शक्ती’ वेब पोर्टलचे अनावरण
वाशिम, दि. ०८ (जिमाका) : मानव विकास कार्यक्रमामध्ये समाविष्ट वाशिम, मालेगाव, रिसोड व मानोरा या चार तालुक्यात महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या ०७ लोकसंचालीत साधन केंद्रांना तेजश्री फायनान्सशियल सर्व्हिसेस अंतर्गत एकूण १ कोटी ३ लक्ष ९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीच्या धनादेशाचे वितरण महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, समाज कल्याण सभापती वनिता देवरे, महिला व बालकल्याण सभापती शोभा गावंडे, बांधकाम सभापती विजय खानझोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड, ‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, ‘नाबार्ड’चे जिल्हा व्यवस्थापक विजय खंडरे, ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बचत गटाचे सदस्य असलेल्या अतिगरीब कुटुंबांना उपजीविकेचे साधन निर्माण करणे, कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या कुटुंब, गटाला कर्जातून बाहेर काढणे आणि सीएमआरसी स्तरावर सामाजिक मूल्यवर्धित प्रकल्प राबविण्यासाठी तेजश्री फायनान्सशियल सर्व्हिसेस अंतर्गत निधी देण्यात आला आहे.
राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील महिला बचत गटांचे डीजीटायझेशन करण्यासाठी ‘ई-शक्ती’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत २ हजार बचत गटांचे डीजीटायझेशन करण्यात आले असून या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘ई-शक्ती’ पोर्टलचे आज ॲड. श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी श्री. नागपुरे व ‘नाबार्ड’चे श्री. खंडरे यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली.
जिल्ह्यातील महिला बचतगटांचे काम चांगले असून त्यांच्या उत्पादनांना वाशिम शहरात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करावेत, अशा सूचना ॲड. श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिल्या. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व कृषि विभागाच्या बीज प्रक्रियाविषयक संयुक्त उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या बचत गटांच्या कार्याचेही त्यांनी यावेळी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश