हेल्पलाईनवर स्वतःहून माहिती दिलेल्या ४ जणांना कोरोना संसर्गाचे निदान
·
लवकर
निदान होवून उपचार सुरु झाल्याने प्रकृती स्थिर
·
लक्षणे
असलेल्या इतर नागरिकांनीही संपर्क साधण्याचे आवाहन
·
लवकर
निदान झाल्यास कोरोना बरा होण्याची शक्यता
अधिक
वाशिम, दि. १२ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गाचे लवकर निदान
होवून उपचार सुरु झाल्यास रुग्ण बरे होण्याची शक्यता अधिक आहे. याउलट परिस्थिती
हाताबाहेर गेल्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्यास डॉक्टरांना उपचारासाठी पुरेसा
कालावधी मिळत नसल्याने अशा बाधित व्यक्तींचा मृत्यूही होवू शकतो. त्यामुळे कोरोना
संसर्गाची लक्षणे दिसताच स्वतःहून पुढे येवून माहिती देण्याचे, आपली तपासणी करून
घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले होते. त्यानुसार आतापर्यंत जिल्हा
प्रशासनाच्या हेल्पलाईनवर स्वतःहून माहिती दिलेल्या चार व्यक्तींना कोरोना विषाणू
संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. सदर चारही व्यक्तींवर तातडीने उपचार सुरु करण्यात
आले आहेत. लवकर निदान होवून उपचार सुरु झाल्याने या चारही व्यक्तींची प्रकृती
स्थिर असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
कोरोना
संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये ताप, सर्दी, कोरडा खोकला, घसा दुखणे, जिभेची चव
जाणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी प्रमुख लक्षणे आढळतात. लवकर निदान झाल्यास, योग्य औषधोपचार मिळाल्यास या आजारातून बाधित व्यक्ती
बरी होते. त्यामुळे अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तातडीने, स्वतःहून नजीकच्या
फिव्हर क्लिनिकमध्ये येवून आपली तपासणी करून घ्यावी, अथवा जिल्हा प्रशासनाच्या
८३७९९२९४१५ या व्हॉटस्अप हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी
श्री. मोडक यांनी केले आहे.
एखादी
व्यक्ती कोरोना बाधित आढळल्यास त्या व्यक्तीकडे,
तिच्या कुटुंबाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलतो, असा अनुभव
असल्याने कोरोना संसर्गाची लक्षणे असलेल्या व्यक्ती आपला आजार लपवतात, तपासणीसाठी
लवकर पुढे येत नाहीत. त्रास वाढल्यानंतर, परिस्थिती अधिक बिकट झाल्यानंतरच ह्या
व्यक्ती रुग्णालयात येतात. परिणामी, या संसर्गाचे निदान होण्यास विलंब होतो,
डॉक्टरांना उपचारासाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि त्या व्यक्तीला आपला
जीव गमवावा लागतो. दरम्यानच्या काळात इतर व्यक्तींनाही त्यांच्यापासून संसर्ग
होतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूला, कुटुंबात अशी लक्षणे असलेल्या
व्यक्तींना आरोग्य तपासणीसाठी प्रोत्साहित करणे, त्याला मानसिक
आधार देणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या व्यक्तींलाही वेळेत उपचार मिळतील व
तिच्यापासून इतरांना होणारा संसर्गही मर्यादित राहील, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.
मोडक यांनी केले आहे.
Comments
Post a Comment