पीक नुकसानीच्या पंचनाम्याची डाटा एन्ट्री अचूक करा - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक






वाशिम, दि. ०७ : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरु आहेत. प्रत्येक पंचनाम्याची डाटा एन्ट्री करणे आवश्यक असून यामध्ये सर्व माहिती अचूक भरली जाईल, याची दक्षता संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी तसेच प्रत्येक तालुक्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पंचनामे डाटा एन्ट्री विषयक नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, उपविभागीय कृषि अधिकारी दत्तात्रय चौधरी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील सहाय्यक निबंधक आर. एल. गडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, पीक नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकांच्या नुकसानीची माहिती राज्य शासन व विमा कंपनीला पाठविण्यासाठी संगणकाच्या सहाय्याने विहित नमुन्यात भरणे व बाधित पिकांचे फोटो सादर करणे आवश्यक आहे. सर्व संबंधित तलाठी, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक यांच्यावर ही माहिती भरण्याची जबाबदारी असून हे काम अचूक होण्यासाठी महसूल मंडळ अधिकारी, कृषि मंडळ अधिकारी व पर्यवेक्षक यांनी सदर प्रक्रियेचे संनियंत्रण करावे. तसेच माहिती भरण्याचे काम गतीने व अचूक होण्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय एका जिल्हास्तरीय अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून या अधिकाऱ्यांनी संबंधित सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवून हे काम गतीने पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली पीक नुकसानीची पाहणी
मंगरूळपीर, मानोरा व कारंजा तालुक्यात परतीच्या पावसाने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज पाहणी केली. मंगरूळपीर तालुक्यातील लाठी, हिसई, चांभई, जोगलदरी, मानोरा तालुक्यातील साखरडोह, दापुरा, कारंजा तालुक्यातील कोळी व तपोवन शिवारातील शेतकऱ्यांशी संवाद साधत जिल्हाधिकाऱ्यांनी पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली. तसेच या गावांमध्ये सुरु असलेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा सुद्धा आढावा घेतला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसीलदार किशोर बागडे, तालुका कृषि अधिकारी सचिन कांबळे, कारंजाचे तालुका कृषि अधिकारी संतोष वाळके आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे