केंद्रीय पथकाने केली वाशिम जिल्ह्यातील पीक नुकसानीची पाहणी








वाशिम, दि. २४ : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात आलेल्या अवेळी पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. केंद्र सरकारने या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी एक केंद्रीय पथक गठीत केले आहे. या पथकातील केंद्रीय कृषि मंत्रालयांतर्गत येणाऱ्या कापूस विकास संचालनालयाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. आर. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेतीची आज, २४ नोव्हेंबर रोजी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, अमरावती विभागाचे कृषि सहसंचालक सुभाष नागरे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, रिसोडचे तहसीलदार अजित शेलार, वाशिमचे तहसीलदार विजय साळवे, तालुका कृषि अधिकारी अभिजित देवगिरीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री. सिंग यांच्या पथकाने रिसोड तालुक्यातील महागाव येथील माधव गायकवाड यांच्या नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली व झालेल्या पीक नुकसानीची माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली. श्री. गायकवाड यांनी ३ हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी केली होती. यापैकी बहुतांश सोयाबीनचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. जे काही सोयाबीन होणार आहे, त्यालाही १८०० रुपये प्रतीक्विंटल पेक्षाही कमी भाव मिळेल. तुरीचेही पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. महागाव शेतशिवारातील सुमारे ६४२ हेक्टरवर सोयाबीन पेरण्यात आले होते, यापैकी सुमारे ९० टक्के क्षेत्रावरील सोयाबीनचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बाळखेड येथील रमेश भारती यांच्या शेतातील झालेल्या पीक नुकसानीचीही श्री. सिंग यांच्या पथकाने पाहणी केली. श्री. भारती यांच्या नदीकाठी असलेल्या तीन हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन आणि तूर पिकाचे नुकसान झाल्याने सोयाबीन व तुरीच्या उत्पन्नात घट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षी एकरी सात ते आठ क्विंटल तूर या शेतात झाली. पाण्यामुळे जमीन खरडून गेली आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जवळपास पाच वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे श्री. भारती म्हणाले.
वाशिम तालूक्यातील नागठाणा येथील रामप्रसाद चव्हाण यांच्या शेतातील पीक नुकसानीची श्री. सिंग यांच्या पथकाने पाहणी केली. पाऊस येण्याच्या अगोदरच सोयाबीनची कापणी केली, मात्र कापणी केल्यानंतर पाऊस आल्याने संपूर्ण सोयाबीन भिजले. त्यामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच तुरीचे देखील नुकसान झाले आहे. मागील वर्षी एकरी ६ ते ७ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न झाले. यंदा जवळपास ७० टक्के नुकसान झाले. जास्त पाण्यामुळे तुरही जळाली, आता एकरी १ क्विंटल तरी तूर होईल की नाही, याबाबत शंका आहे. शेतात जवळपास एक फुट पाणी २० दिवस होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि तूर पिकाचे नुकसान झाल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
वांगी येथील रामेश्वर चांडक यांच्याही शेतातील पिकाची पाहणी पथकाने केली. श्री. चांडक यांच्याकडे ५ एकर शेती असून यामध्ये ते दरवर्षी तूर आणि सोयाबीनचे पीक घेतात. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात आलेल्या अवेळी पावसामुळे तूर आणि सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीन सडून गेले आणि तूर पिकाचेही नुकसान झाले. आता हरभरा लावलेला आहे. मागील वर्षी सोयाबीनचे प्रती एकरी चार क्विंटल उत्पन्न मिळाले, यावेळी आलेल्या अवेळी पावसामुळे केवळ दीड क्विंटलपर्यंत उत्पन्न होईल. मात्र हे सोयाबीन काळे झाले असल्याने पाहिजे तसा दर मिळणार नाही, असे श्री. चांडक यांनी केंद्रीय पथकाचे प्रमुख आर. पी. सिंग यांना सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात आलेल्या अवेळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीबाबतची माहिती श्री. सिंग यांना दिली. पीक नुकसानीचे पंचनामे करून नुकसानीची माहिती राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे