खचून जावू नका, शासन तुमच्या पाठीशी आहे !
·
नुकसानग्रस्त
शेतकऱ्यांशी पालकमंत्री संजय राठोड यांचा संवाद
·
परतीच्या
पावसाने झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांकडून पाहणी
·
वाशिम
जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची माहिती राज्य शासनाला देणार
वाशिम, दि. ०२ : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे
मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात उभे असलेले सोयाबीन तसेच काढणी झालेल्या
सोयाबीनसह इतरही भाजीपाला, फळपिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे
राहिले आहे. मात्र शेतकऱ्यांनी या संकटामुळे खचून न जाता त्याचा धीराने सामना
करावा. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून जिल्ह्यात झालेल्या
नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना देवून शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची
मागणी करणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
परतीच्या
पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री श्री. राठोड
आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी, उपविभागीय
अधिकारी अनुप खांडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, कारंजाचे तहसीलदार
धीरज मांजरे, मानोराचे तहसीलदार सुनील चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. राठोड यांनी कारंजा तालुक्यातील
गिरडा येथील शेतकरी विष्णू गुल्हाने व विवेक गोडगे यांच्या सोयाबीन पिकाची, काझी
अहमदमुल्ला यांच्या कापूस पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच वाकी वाघोडा येथील
राजू चव्हाण, मानोरा तालुक्यातील दापुरा येथील सुशीला दयाराम राठोड व वाईगौळ येथील
ज्योती वानखेडे यांच्या सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच
परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना
त्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी राज्य शासन
पाठपुरावा करणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला नव्हता,
अशा शेतकऱ्यांना राज्य शासन नुकसानभरपाई देईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानीमुळे
खचून जावू नये. परतीच्या पावसामुळे ओढावलेल्या या संकटात राज्य शासन शेतकऱ्यांच्या
पाठीशी खंबीरपणे उभे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार
जिल्ह्यातील शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली असून या नुकसानीची माहिती राज्य
शासनाला देणार असल्याचे पालकमंत्री श्री. राठोड यांनी यावेळी सांगितले.
आ. पाटणी म्हणाले, जिल्ह्यातील शेतपिकांच्या नुकसानीची
माहिती राज्य शासनाला देवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी
पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून
वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले
*****
Comments
Post a Comment