पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धेतील विजेत्या गावांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस वितरण




·        कारंजा, मंगरूळपीर तालुक्यातील गावांचा समावेश
वाशिम, दि. ०४ :  पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धा २०१८ मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कारप्राप्त गावांना राज्य शासनाने जाहीर केलेल्या बक्षिसाचे आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. प्रथम व द्वितीय पुरस्कार प्राप्त गावांना प्रत्येकी ५ लाख रुपये व प्रमाणपत्र तर तृतीय पुरस्कार विजेत्या गावांना प्रत्येकी ३ लाख रुपये व प्रमाणपत्र असे या बक्षिसाचे स्वरूप आहे.
जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे, रोहयोचे नायब तहसीलदार घनश्याम डाहोरे यांच्यासह बक्षीस विजेत्या गावांचे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ तसेच पाणी फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
वॉटर कप स्पर्धेत कारंजा तालुक्यातील प्रथम पुरस्कार प्राप्त विळेगावच्या सरपंच माला संजय घुले, द्वितीय पुरस्कारप्राप्त बेलमंडलचे सरपंच सचिन काशिनाथ एकणार व तृतीय पुरस्कार विजेत्या बांबर्डा गावच्या सरपंच कांचन अनंतराव भेंडे, मंगरूळपीर तालुक्यातील प्रथम व द्वितीय पुरस्कार प्राप्त अनुक्रमे बोरव्हा बु. व लखमापूर गावचे सरपंच गोपाल लुंगे, तृतीय पुरस्कार प्राप्त शेंदूरजना मोरे गावचे अशोक धामंदे यांच्यासह संबंधित गावांचे ग्रामसचिव व ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षिसाचे धनादेश स्वीकारले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. मीना म्हणाले, कारंजा व मंगरूळपीर तालुक्यातील ज्या गावांनी गतवर्षी वॉटर कप स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होवून श्रमदान केले, त्या गावांना रक्कम स्वरूपातील बक्षीस व पुरस्कार मिळाले. पण त्यांच्या कष्टाचे खरे चीज म्हणजे त्यांच्या गावात पावसाळ्यामध्ये अडविल्या गेलेल्या पाण्यामुळे त्यांना झालेला फायदा आहे. यावर्षीच्या वॉटर कप स्पर्धेत सुध्दा कारंजा व मंगरूळपीर तालुक्यांचा समावेश झाला आहे. या संधीचा लाभ घेवून या दोन्ही तालुक्यातील गावांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच एकजुटीने व उत्स्फुर्तपणे गावात श्रमदान करून जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करून आपल्या जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर पोहोचवावे. गतवर्षी ज्या गावांनी जिल्हास्तरीय पुरस्कार मिळविले त्यांचा आदर्श इतर गावांनी घेवून अधिकाधिक प्रमाणात श्रमदानातून जलसंधारणाची कामे करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविक श्री. नानवटे यांनी केले. ते म्हणाले, यावर्षी पाणी फाऊंडेशनच्यावतीने जिल्ह्यातील विळेगाव व बोरव्हा येथे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार असून त्याचा लाभ स्पर्धेत सहभागी झालेल्या जिल्ह्यातील सर्व गावांना मिळणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र लोखंडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार समाधान वानखडे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे