प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजच्या कोनशिलेचे अनावरण
वाशिम, दि. ०३ :
केंद्र
शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान २.०
(रुसा) अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील चिखली येथे १८ कोटी २५ लाख रुपये खर्च करून
उभारण्यात येणाऱ्या नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजच्या कोनशिलेचे अनावरण श्रीनगर
येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डिजिटल लाँचिंगद्वारे केले.
यानिमित्त वाशिम येथील जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित
कार्यक्रमाला खासदार भावना गवळी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी दीपक कुमार मीना, उच्च शिक्षण विभागाचे सह संचालक डॉ. मोहन खताळ, सह
संचालक अशोक कळंबे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव हेमंत देशमुख, शिक्षणाधिकारी
माध्यमिक तानाजी नरळे, जिल्हा सूचना व विद्यान अधिकारी सागर हवालदार यांच्यासह
विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी
खा. गवळी यांच्या हस्ते स्थानिकरित्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
रुसा टप्पा-२ अंतर्गत देशातील ३३०० कोटी
रुपयांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केल्यानंतर प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी ‘जय
जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’ चा नारा दिला. ते म्हणाले, आज भारतातील
विद्यार्थी मोठ्या संख्येने परदेशात जावून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे भारताचे अरबो-खरबो
रुपये विदेशात जात आहेत. रुसा व इतर शिक्षण विषयक योजनांच्या माध्यमातून आजच्या जागतिकीकरणाच्या
युगात देशामध्ये जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचा व त्यासाठी अद्ययावत शिक्षण
संस्था उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. भारतातील विद्यार्थी परदेशात नव्हे, तर
परदेशातील विद्यार्थी भारतात शिक्षण घेण्यासाठी येतील, अशा शिक्षण सुविधा निर्माण
करण्यास आमचे प्राधान्य आहे.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काही राज्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले, देशातील पर्यटन
क्षेत्र हे अतिशय वेगाने वाढणारे क्षेत्र असून यामध्ये रोजगार निर्मितीला मोठा वाव
आहे. तसेच यामाध्यमातून विदेशी चलनही देशाला मिळू शकते. त्यामुळे युवकांनी विविध नाविन्यपूर्ण
कल्पना वापरून पर्यटन क्षेत्रात व्यवसाय सुरु करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ते पुढे म्हणाले की, स्टार्ट अप योजनेला देशात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आज स्टार्ट
अपमध्ये चीन, अमेरिकानंतर भारत जगात तिसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे यातील
बहुतांश स्टार्ट अप कार्यक्रम हे महानगरात नव्हे तर शहरी भागात आहेत.
खेलो इंडिया अंतर्गत देशामधील नवीन
खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम सरकार करीत आहोत. आज देशभरातील छोट्या-छोट्या शहरात
स्टेडियम उभारले जात आहेत आणि त्यामधून नवीन प्रतिभा समोर येत असल्याचे प्रधानमंत्री
श्री. मोदी यावेळी म्हणाले.
Comments
Post a Comment