पात्र व्यक्तीला अन्न सुरक्षा, आरोग्यविषयक सेवांचा लाभ द्या - किशोर तिवारी
वाशिम, दि. ०८ :
ग्रामीण भागातील पात्र
व्यक्तीला अन्न सुरक्षा योजना, निराधार योजना व आरोग्यविषयक सेवा-सुविधांचा लाभ
मिळणे आवश्यक आहे. या योजनांपासून एकही पात्र व्यक्ती वंचित राहणार नाही, याची
दक्षता संबंधित शासकीय यंत्रणांनी घ्यावी, अशा सूचना कै. वसंतराव नाईक शेती
स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
वाकाटक सभागृहात आज आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक
कुमार मीना, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश
हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक अंबादास सोनटक्के, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी
दत्तात्रय गावसाने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, जिल्हा ग्रामीण विकास
यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक श्री. गोहाड, महावितरणचे कार्यकारी अभियंता
श्री. तायडे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सैफ नदाफ, सहाय्यक जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. एस. व्ही. मेहकरकर यांच्यासह संबंधित
विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. तिवारी म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांश
जनता ही गरीब असल्याने आरोग्य सेवांकरिता ती शासकीय रुग्णालयांवर अवलंबून आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील
वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही गतिमान करावी. तसेच सर्व
शासकीय रुग्णालयांमध्ये व जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये स्वच्छतेला प्राधान्य
दिले जावे. प्रेरणा प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांना आवश्यक उपचार व आरोग्य सुविधा
उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. जिल्ह्यात सार्वजनिक धान्य
वितरण व्यवस्थेमध्ये ई-पॉस मशीनचा वापर सुरु करण्यात आल्याने जवळपास ६ हजार
क्विंटल धान्याची बचत होत आहे. ‘मागेल त्याला धान्य’ अभियान राबवून जिल्ह्यातील
प्रत्येक पात्र व्यक्तीला अन्न सुरक्षा योजनेचा लाभ द्यावा, असे त्यांनी यावेळी
सांगितले.
जिल्ह्यात गट शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषि
विभागाने मंजुरी दिलेल्या १५ शेतकरी गटांच्या प्रस्तावांना बँकांकडून अर्थसहाय्य
उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा. याकरिता संबंधित
बँकांचे अधिकारी व शेतकरी गटांचे प्रतिनिधी यांचा समन्वय घडवून आणण्याच्या सूचना
श्री. तिवारी यांनी दिल्या. जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याबाबत पोलीस विभागाने
पुढाकार घ्यावा. जिल्ह्यातील वरली मटका बंद करावा व अवैध दारू विक्री जिल्ह्यात
होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अन्यथा संबंधित पोलिसांना जबाबदार धरून
त्यांच्यावर कारवाई करावी. त्यामुळे गरीब लोक यामधून उद्ध्वस्त होण्यापासून
वाचण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
जिल्ह्यातील सर्व पारधी कुटुंबांना अंत्योदय योजनेचा
लाभ मिळाला पाहिजे, यासाठी पुरवठा विभागाने विशेष लक्ष द्यावे. ज्यांना रेशनकार्ड
नाही, अशांना रेशनकार्ड देखील उपलब्ध करून द्यावे. उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस
कनेक्शन देताना ग्राहकांना अडचणीचा सामना करण्याची वेळ येणार नाही, याची काळजी
पुरवठा विभागाने घ्यावी. तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी
यांनी जिल्ह्यातील पारधी बेड्यांचे सर्वेक्षण करून तेथे उपलब्ध असलेल्या मुलभूत
सुविधांची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना श्री. तिवारी यांनी यावेळी दिल्या.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, अटल पणन योजनेची
प्रगती, प्रलंबित कृषिपंप वीज जोडण्या, तूर खरेदी व प्रलंबित तूर व हरभरा चुकारे
आदी विषयांचाही श्री. तिवारी यांनी आढावा घेतला. तसेच शेतकरी संवाद यात्रा
कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे
त्यांनी सांगितले. तसेच या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय व
जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या.
Comments
Post a Comment