प्रत्येक शेतकरी' उत्पादक कंपनीमध्ये समाविष्ट होण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे प्रकल्प संचालक अनिसा महाबळे फलोत्पादन पिकावरील किड व रोग सर्वेक्षण एकदिवसीय प्रशिक्षण उत्साहात संपन्न
'प्रत्येक शेतकरी' उत्पादक कंपनीमध्ये समाविष्ट होण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे
प्रकल्प संचालक अनिसा महाबळे
फलोत्पादन पिकावरील किड व रोग सर्वेक्षण एकदिवसीय प्रशिक्षण उत्साहात संपन्न
वाशिम,दि.२१ जून (जिमाका) प्रत्येक शेतकरी खातेदार हा शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये समाविष्ट झाला पाहिजे. यासाठी कृषी विभागातील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी केले. बहुपीक पद्धतीचा अवलंब करून व जलपातळी वाढीच्या उपायोजना करण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन एकत्रित कामे केल्यास लवकरच सिंचन क्षेत्रामध्ये भरीव वाढ होईल तसेच शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. फलोत्पादन पिकावरील किड व रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) सन २०२४-२५ अंतर्गत किड व रोग सर्वेक्षण चमुचे एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानावरून श्रीमती महाबळे बोलत होत्या. यावेळी प्रमुख मार्गदर्शक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरिफ शाह,कृषी विज्ञान केंद्र करडाचे विषय विशेषज्ञ निवृत्ती पाटील यांची उपस्थिती होती.तसेच कृषी उपसंचालक शांतीराम धनुडे, उपविभागीय कृषी अधिकारी अतुल जावळे,तंत्र अधिकारी प्रियंका कावरे, लक्ष्मण सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तंत्र अधिकारी श्री.सावंत यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून फलोत्पादन पिकावरील किड व रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत किड व रोग सर्वेक्षण या योजनेविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले. विशेषतः संत्रा फळबागेमधील रोग व किड नियंत्रण याविषयी श्री.पाटील यांनी मार्गदर्शन केले. श्री शाह यांनी मिश्र पीक व बहुपीक पद्धती विषयी मार्गदर्शन करतांना सध्या परिस्थितीत निसर्गाचा समतोल ढळलेला असल्याने एकच पीक घेणे हे जोखीमेचे ठरत असल्याने एकल पिकावर अवलंबून न राहता शेतीतील पीक उत्पन्नाची जोखीम कमी करण्यासाठी मिश्र पीक व बहुपीक पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे बनले असल्याचे यावेळी सांगितले. तसेच ज्या ठिकाणी नवीन विहिरी झाल्या आहेत त्या ठिकाणी सिंचनाची सुविधा नव्याने उपलब्ध झाली आहे अशा शेतकऱ्यांकडे रोजगार हमी योजनेअंतर्गत व भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत जास्तीत जास्त फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .तसेच जलतारा संकल्पनेतून प्रति एकर एक प्रमाणे रिचार्ज पीट घेऊन जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्याचेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर,मानोरा तसेच मंडळ कृषी अधिकारी ,कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन गोपाल मुठाळ यांनी केले तर आभार तालुका कृषी अधिकारी मानोरा उमेश राठोड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भागवत डोईफोडे, सुहास भगत, नितीन धवसे,गगन आडे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment