अतिसार नियंत्रण पंधरवडा मोहीम प्रभावीपणे राबवा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
अतिसार नियंत्रण पंधरवडा मोहीम प्रभावीपणे राबवा
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
अतिसार नियंत्रण पंधरवड्यानिमित्त जिल्हास्तरीय सुकाणू समितीची सभा संपन्न
वाशिम,दि.६ जून (जिमाका) जिल्ह्यात दिनांक ६ जून ते २१ जूनदरम्यान अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येत आहे.यामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने ० ते ५ वर्ष वयोगटातील बालके असणाऱ्या सर्व घरातील बालकांचे सर्वेक्षण केल्या जाणार आहे. यामध्ये अतिसार असलेल्या बालकांना ओआरएस जलसंजीवनी व झिंक गोळीची मात्रा दिल्या जाणार आहे. तसेच या कालावधीमध्ये आशा स्वयंसेविकांमार्फत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात प्रत्येक घरी भेट देऊन अतिसार आजाराबद्दल जनजागृती, हात धुण्याची पद्धत इत्यादीबद्दल माहिती देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. व मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात जिल्हास्तरीय सुकाणू समितीची सभा संपन्न झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर मोहीम प्रभावीपणे राबवण्याबाबत आरोग्य विभागात सूचना दिल्या .तसेच पावसाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने नागरिकांनी स्वच्छ पाणी प्यावे.उकळून गाळून थंड केलेले पाणी प्यावे इत्यादी माहिती व जनजागृती ग्रामस्तरांपर्यंत पोहोचवण्याबाबत सूचना दिल्या. अतिसार नियंत्रण पंधरवड्यामध्ये जिल्ह्यात ० ते ५ वर्षे वयोगटाखाली एक लाख दहा हजार ४१७ बालके असून सदर बालकांचे सर्वेक्षण केल्या जाणार आहे .
या आढावा बैठकीस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मोबीन खान, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. विजय काळे उपस्थित होते. सदर मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस. ठोंबरे यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात येत आहे.
Comments
Post a Comment