देगाव येथील शाळेतील सर्व बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर
·
कोणालाही
कोरोनाचे गंभीर लक्षण नाही
·
शाळेचे
कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतर
·
विद्यार्थ्यांची
तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी
·
जि.प.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची शाळेला भेट
वाशिम
(जिमाका) दि. २५ : रिसोड
तालुक्यातील देगाव येथील एका निवासी शाळेतील ४ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व
वसतिगृहात राहणारे २२९ विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आले. त्यानंतर जिल्हाधिकारी
षण्मुगराजन एस. यांनी २४ फेब्रुवारी रोजी तातडीने शाळेला भेट देवून बाधित विद्यार्थ्यांना
आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी संबंधित विभागांना सूचना दिल्या. या शाळेच्या
वसतिगृहाची इमारत आता कोविड केअर सेंटर म्हणून घोषित करण्यात आली आहे. जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनीही आज, २५ फेब्रुवारी रोजी
शाळेला भेट देवून विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक सद्यस्थितीचा आढावा घेतला. सर्व
बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही गंभीर
लक्षणे आढळलेली नाहीत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
देगाव
येथील संबंधित शाळेत आजूबाजूच्या जिल्ह्यातून विद्यार्थी दाखल झाले. कोरोना चाचणी केल्यानंतरच
शाळा सुरु करण्याचे ठरल्याने शाळा सुरु होण्यापूर्वी वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांची
कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये २२९ विद्यार्थी तसेच ४ शिक्षक, शिक्षकेतर
कर्मचारी बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत
या विद्यार्थ्यांना आवश्यक उपचार उपलब्ध करून दिले. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.
यांनी २४ फेब्रुवारी स्वतः शाळेला भेट कोरोना बाधित विद्यार्थ्यांना योग्य उपचार व
इतर आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत सूचना केल्या. तसेच या सर्व कार्यवाहीवर देखरेख
ठेवण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक
केली.
शाळेमध्ये
डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके तैनात केली असून त्यांच्यामार्फत बाधित
विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी होत आहे. २४ फेब्रुवारी जिल्हा आरोग्य
अधिकारी यांच्या अधिपत्याखालील तज्ज्ञ डॉक्टरांनी सर्व बाधित विद्यार्थ्यांची
तपासणी केली असून काही विद्यार्थ्यांना सर्दी असून इतर कोणालाही कोरोनाची लक्षणे नाहीत.
२५ फेब्रुवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील छातीचे चिकित्सकतज्ज्ञ (चेस्ट फिजिशियन), बालरोग
तज्ज्ञ डॉक्टरांसह इतर स्पेशालिस्ट डॉक्टरांनी सर्व बाधित विद्यार्थ्यांची पुन्हा
एकदा आरोग्य तपासणी केली आहे. शाळा कोविड केअर सेंटर घोषित करण्यात आले असून शाळा
व वसतीगृहाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
बाधित
आढळलेले विद्यार्थ्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातील १५१, यवतमाळ जिल्ह्यातील ५५,
वाशिम जिल्ह्यातील ११, बुलडाणा जिल्ह्यातील ३, अकोला जिल्ह्यातील १, हिंगोली
जिल्ह्यातील ८ विद्यार्थ्यांचा समावेश असून संबंधित जिल्हा प्रशासनाला याची माहिती
कळविण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने आढावा
देगाव
येथील शाळेतील कोरोना बाधित विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये, यासाठी जिल्हाधिकारी
षण्मुगराजन एस. यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देवून सर्व संबंधित विभागांना सूचना
केल्या आहेत. तसेच ही शाळा कोविड केअर सेंटर घोषित करण्यात आले आहे. जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी सुद्धा आज, २५ फेब्रुवारी
रोजी संबधित शाळेला भेट देवून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सद्यास्थिती, त्यांना
पुरविण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव
वाघमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश
आहेर हे सातत्याने बाधित विद्यार्थ्यांच्या तब्येतीवर व त्यांना पुरविण्यात
येणाऱ्या आरोग्य सुविधांवर लक्ष ठेवून आहेत.
Comments
Post a Comment