कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.
·
कोणत्याही
कार्यक्रमाला ५० पेक्षा जास्त उपस्थिती नको
·
सार्वजनिक
ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक
·
भाजीपाला,
फळे बाजार विकेंद्रित ठिकाणी सुरु करा
वाशिम, दि. १७ (जिमाका) : कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी
होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरपालिका व ग्रामपंचायत
क्षेत्रात गर्दी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घेण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक
सभागृहात आज, १७ फेब्रुवारी रोजी विविध जिल्हास्तरीय अधिकारी, गट विकास अधिकारी,
तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिका व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या बैठकीत ते
बोलत होते.
यावेळी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत
परदेशी, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे,
उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अतुल कानडे,
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर,
प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) विकास बंडगर, आयएमए अध्यक्ष डॉ. अनिल
कावरखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी
षण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात काही दिवसात कोरोना सुरक्षा नियमांचे पालन
करण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. नागरिकांनी घराबाहेर
पडल्यानंतर चेहऱ्यावर मास्क लावणे आवश्यक आहे. तसेच वारंवार हात स्वच्छ धुणे व सोशल
डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. बाजारपेठेत तसेच इतर सार्वजनिक
ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येणार असून बाजारपेठ, हॉटेल, रेस्टॉरंट,
दुकाने, पेट्रोलपंप, लग्न
अथवा इतर समारंभ, खेळाची मैदाने यासह सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर
मास्क न लावणाऱ्या, कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक
कारवाई करण्यात येणार आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट, दुकाने,
पेट्रोलपंप, लग्न कार्यालये व लॉन यासह इतर आस्थापनांमध्ये लोकांना
प्रवेश देताना त्यांना मास्कचा वापर बंधनकारक करावा. या आस्थापनांमध्ये कोरोना
सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित आस्थापनेच्या मालकाची
राहील व त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी
षण्मुगराजन एस. म्हणाले. सदर आस्थापनांची तपासणी करण्यासाठी नगरपालिकांनी पथके
स्थापन करून दैनंदिन कार्यवाहीचा अहवाल तयार करावा. अन्न व औषध प्रशासन विभागाने
जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट यांची नियमित तपासणी करून
याठिकाणी कोरोना सुरक्षा नियमांचे पालन होईल, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी
सांगितले.
नगरपालिकेने
भाजीपाला, फळे विक्रेत्यांना विकेंद्रित स्वरुपात जागा उपलब्ध करून देवून एकाच
ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करावी. तसेच ग्रामीण भागात होणाऱ्या
आठवडी बाजारांच्या दिवशी ग्रामसेवकांनी स्वतः उपस्थित राहून कोरोना सुरक्षा
नियमांचे पालन होईल, यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. प्रवासी वाहतुकीदरम्यान
प्रत्येकाने मास्कचा वापर करणे बंधनकारक असून त्याची जबाबदारी परिवहन विभागावर
राहील. खुल्या मैदानात अथवा क्रीडांगणावर जाताना मास्कचा वापर करणे आवश्यक आहे,
त्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जावू नये, अशा सूचनाही जिल्हाधिकारी षण्मुगराजन
एस. यांनी यावेळी दिल्या.
मुख्य
कार्यकारी अधिकारी श्री. मोहिते म्हणाले, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची
प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. नियमांचे
उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर करावी. ग्रामीण भागात सुद्धा विविध
कार्यक्रमांच्या निमित्ताने गर्दी होवू नये, याची खबरदारी घ्यावी.
पोलीस
अधीक्षक श्री. परदेशी म्हणाले, लोकांमध्ये कोरोना संसर्गाबाबतचे गांभीर्य कमी झाले
असून आवश्यक खबरदारी न घेतल्याने रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे यापुढे
सर्वांनी मास्कचा वापर, वारंवार हात स्वच्छ धुणे व सोशल डिस्टन्सिंग या
त्रिसूत्रीचा वापर करावा. प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचारी
यांनी या नियमांचे पालन करण्यावर भर द्यावा.
अंत्यविधी, लग्न समारंभाला मर्यादित उपस्थिती राहणार
गर्दीवर
नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात होणारे लग्न समारंभ
यासह सर्व कार्यक्रमांना तसेच अंत्यविधीला केवळ ५० व्यक्तींना उपस्थित राहण्याची
परवानगी राहणार आहे. लग्नामध्ये ५० पेक्षा अधिक लोक उपस्थित राहिल्यास वधू-वराच्या
कुटुंबियांसह संबंधित लग्न कार्यालय, लॉन मालकावर सुद्धा कारवाई केली जाईल. शहरी
भागामध्ये नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामीण भागात ग्रामसेवक, तलाठी व पोलीस पाटील
यांच्या पथकावर ही जबाबदरी राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.
यांनी दिली.
लक्षणे असलेल्या प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी करा
कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे आढळतात. कोरोना संसर्गाचे लवकर निदान होवून योग्य उपचार मिळाल्यास रुग्ण बरा होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी मनात कोणतीही भीती न बाळगता लक्षणे दिसताच त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक बाधिताचे लवकर निदान व उपचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कोरोना संसर्गाची लक्षणे असल्यास त्याला कोरोना चाचणीसाठी पाठवावे. जिल्ह्यातील सर्व खाजगी डॉक्टरांनी सुद्धा यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
Comments
Post a Comment