निंबोळीचा वापर शेतकऱ्यांसाठी वरदान !
कडूनिंब
एक उत्कृष्ठ कीड व रोग प्रतिरोधक
कृषि
क्षेत्रात निंबोळी अर्क हे एक ‘जगातील अत्यंत सुरक्षित कीडनाशक’ आहे. स्वस्त आणि विषमुक्त
अन्नधान्य तयार करण्यासाठी कीडनाशक म्हणून त्याचा वापर केल्यास उत्पादन खर्चात बचत
होत असल्यामुळे निंबोळी अर्क वापरण्याचे अनन्य साधारण महत्व आहे. शेतकऱ्यांना कृषि
क्षेत्रात निंबोळीचे महत्व व त्याबाबत महत्वाची सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्याच्या
उद्देशाने जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कृषि क्षेत्रात
निंबोळीपासून तयार करण्यात येणाऱ्या अर्क, तेल, भुकटी व पेंड याविषयी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी दिलेली माहिती...
पिकावर
पडलेल्या रोगांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अथवा पिकांवर किड व रोग पडू नये, यासाठी
शेतकरी त्यावर विविध प्रकारच्या खर्चीक व घातक किटकनाशकाची फवारणी करतात. ही किटकनाशके महाग असतात. त्यामुळे विषबाधा
होण्याचा धोका संभवतो. मात्र, निंबोळी अर्क सारख्या कीडनाशकचा वापर करून पिकसंरक्षणासाठी
होणाऱ्या खर्चात बचत कराता येते. तसेच आरोग्याचा धोकासुद्धा टाळता येतो. तसेच सेंद्रिय
पद्धतीने भाजीपाला व इतर शेतमाल उत्पादन करून शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त नफा मिळवता
येतो.
सद्यस्थितीत
पक्व झालेल्या निंबोळ्या शेतकऱ्यांनी गोळा कराव्यात. कृषि क्षेत्रात निंबोळीचे विविध
फायदे व त्यापासुन किटकनाशक कशाप्रकारे तयार करायचे व त्याचा वापर कसा करावा. तसेच
शेतकऱ्यांनी पिकावरील किड व रोग नियंत्रणासाठी निंबोळी अर्काचीच फवारणी केल्यास महागड्या
किटकनाशकावरील होणाऱ्या खर्चात बचत होईल,
याविषयी कृषि विभागामार्फत शेतीशाळा,
प्रात्यक्षिकाद्वारे निंबोळ्यापासून पिक संरक्षणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
करण्यात येत आहे. कडूनिंब एक उत्कृष्ट किड व रोग प्रतिरोधक आहे. कडूनिंबाच्या पाने
व बियामध्ये महत्वाचे घटक असून शेतीमध्ये विविध पिकावरील किड व रोग नियंत्रणासाठी महत्वाची
भूमिका बजावत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी निंबोळी एक वरदानच ठरलेली आहे.
निंबोळीच्या वापराचे हे आहेत फायदे
निंबोळीच्या
१ ग्रॅम बियामध्ये २ ते ४ मिली ग्रॅम एॅझाडिरेक्टीन आहे, या घटकामुळे किड झाडापासून दूर राहते, त्यांना अपंगत्व येते, किडींचे जिवनचक्र संपुष्टात आणण्याची
शक्ती या घटकात असून किडी नियंत्रणासाठी परिणामकारक आहे. निंबोळीमधील निम्बीडीन व निम्बीन
या महत्वाच्या घटकामध्ये विषाणू विरूद्ध क्रिया करण्याची शक्ती असल्यामुळे पिकावर येणाऱ्या
विषाणूजन्य रोगांवर, तसेच जनावरांच्या विषाणूजन्य रोग नियंत्रणासाठी
उपयुक्त ठरते. मेलियान ट्रिओल हा घातक सुद्धा निंबोळीमध्ये असतो. हा घटक पिकावर पडणाऱ्या
किडींना झाडांची पाने खाऊ देत नाही. त्यामुळे झाडे निरोगी राहून पिकांची उत्तम वाढ
होते. निंबोळीमधील सालानिन्नमध्ये ‘डिएॅसिटील’, ‘एॅझाडिरेक्टीनॉल’ या महत्वाच्या घटक
असल्यामुळे ते पिकावरील भुंगे, खवले, किटक
यांच्या नियंत्रणासाठी प्रभावीपणे काम करते व तसेच हा घटक पानापेक्षा निंबोळीच्या बियामध्ये
जैविक क्रिया करणारा असल्यामुळे किडीच्या विविध प्रजातीवर परिणामकारक काम करून किडीच्या
शरीररचनेत व क्रियेत बदल घडवून किंडींना अपंगत्व आणते.
किडीच्या नियंत्रणासाठी कडुनिंबाच्या अर्क
किडीस
अंडी घालण्यास प्रतिबंधक, अंडीनाशक, किडरोधक दुर्गंध, किडीस
खाद्य प्रतिबंधक, किड वाढरोधक व विविध किडींचे नियंत्रण करणे
इत्यादी महत्वाचे गुणधर्म कडूनिंबाच्या निंबोळीत आहेत. त्यापासुन तयार करण्यात आलेला
अर्क पिकावरील मावा, तुडतुडे, फुलकिडे,
पांढरी माशी, ठिपक्याची बोंडअळी, गुलाबी बोंडअळी, हिरवी बोंडअळी, पाने गुडांळणारी अळी, तांबडी केसाळ अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, शेंडे व पाने पोखरणारी अळी,
लष्करी अळी, घाटे अळी, ऐरंडीवरील
उंट अळी, हिरवे ढेकूण, फळमाशी, ज्वारी व मका वरील खोडकिडा, टोमॅटोवरील सुत्रकृमी,
कोळी, लाल कोळी, नाकतोडा,
लाल ढेकुण, घरमाशी, मिलीबग,
पीस, बटाट्यावरील कोलोरॅडो, मुंगी व भुग्यांची प्रजाती, झुरळाच्या प्रजाती,
इत्यादी किडीच्या नियंत्रणासाठी उपयोगी पडतो. पिकावरील, धान्यावरील महत्वाच्या विविध ४०० ते ५०० किटकांच्या प्रजातीच्या बहूआयामी व
आंतरप्रवाही नियंत्रणासाठी निंबोळी अर्काचा वापर अत्यंत उपयोगी ठरते.
निंबोळी अर्काचा रोग नियंत्रणासाठी वापर
वांगी, नारळ, केळी, नागवेलीची पाने व हरभरावरील मर रोग, वाटाणे व उडीद यावरील
भूरी रोग, बटाटे, साळी यावरील विषाणू रोग,
हरभयावरील मूळकुज, मुगाची
रोपे जळणे, मक्यावरील डाऊनी मिल्ड्यू, साळीवरील
बॅक्टेरीयल ब्लाईट इत्यादी व याव्यतिरीक्त बुरशीनाशक, जिवाणूनाशक,
विषाणूरोधक म्हणून परिणामकारक काम करते.
निंबोळी अर्क (५ टक्के) तयार करण्याची पद्धती
उन्हाळ्यात
पक्व निंबोळ्या गोळा करून साठवलेल्या पाच किलो निंबोळ्या फवारणीआधी १ दिवस कुटुन बारीक कराव्यात. हा चुरा ९ लिटर पाण्यात रात्रभर
भिजत ठेवावा. तसेच १ लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा भिजत टाकावा.
दुसऱ्या दिवशी सकाळी ९ लिटर पाण्यातील निंबोळीद्रावण पातळ कपड्यातून गाळून घ्यावे.
त्यात १ लिटर साबणाचे द्रावण मिसळावे. निंबोळीचा ५ टक्के अर्क तयार होतो. १० लिटर अर्कामध्ये
९० लिटर पाणी टाकून फवारणीसाठी वापर करावा. चांगल्या परिणामकारक फवारणीसाठी १ दिवस
आधी तयार केलेला अर्कचा वापरावा.
कडूनिंबाच्या पानापासुन तयार केलेला अर्क
कडूनिबाची
७ किलो स्वच्छ धुतलेली पाने पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये बारीक करावीत. हे मिश्रण ५
लिटर पाण्यामध्ये मिसळून रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी स्वच्छ कापडातुन गाळून घ्यावे.
हा संपुर्ण अर्क १०० लिटर पाण्यामध्ये मिसळून
फवारणीसाठी वापरावा.
निंबोळी तेल
उन्हात
चांगल्या वाळवलेल्या निंबोळ्यांचे वरील साल काढुन घ्यावे. पांढरा गर उखळीमध्ये ठेचून
लगदा तयार करावा. त्यामध्ये थोडे पाणी टाकावे. हा लगद्याचा गोळा एका परातीत चांगला
थापावा. त्यामुळे त्याच्या पृष्ठभागावर तेल दिसेल. हा तेलाचा लगदा हाताने चांगला दाबुन
त्याचे तेल काढावे. गोळा पुन्हा पुन्हा घट हाताने दाबून गोळ्यातील तेल पुर्णपणे काढावे.
उरलेला गोळा पाण्यात टाकून उकळल्यास तेल पाण्यावर तरंगते ते चमच्याने काडून घ्यावे
किंवा घाण्यामधून अधिक प्रमाणात तेल मिळते. १ किलो बियाण्यात साधरणत: १०० ते १५० मिली
तेल मिळते कडुनिंबाच्या तेलमध्ये एॅझाडिरेक्टीन ०.१५ टक्के, सालानिन्न ०.५ टक्के, एॅसिटील
निंबीन ०.१५ टक्के व इपॉक्झी एॅझाडिरेक्टीन हे घटक असतात. फवारणीसाठी तेल वापरताना
साधरणत: १ ते २ टक्के तेल म्हणजेच १० ते २० मिली तेल प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे
वापरावे.
कडुनिंबाच्या बियांपासून तयार केलेली भुकटी
कडुनिंबाच्या
बियांच्या भुकटीचा तांदळातील सोंडे धान्य पोखरणारे भुंगारे व खापरा भुंगेरे या सारख्या
साठविलेल्या धान्यावरील किडींवर होणया परिणामाचा अभ्यास केला गहू धान्याचे आाकारमानाच्या ०.५ टक्के, १ टक्के व २ टक्के कडुनिंबाच्या बियांचे भुकटी तयार करून धान्यात मिसळली असता
धान्याचे किडीपासून ३२० ते ३२९ दिवसापर्यंत संरक्षण झाल्याचे आढळले. १ टक्के भुकटीच्या
द्रावणात बिया २ तास भिजत ठेवले असता हे बी पेरल्या नंतर सुत्रकृमीचा उपद्रव ५० टक्के
कमी होतो.
निंबोळी पेंड
जमिन
नांगरल्यानंतर हेक्टरी १ ते २ टन निंबोळी पेंड शेतात मिसळविल्यास वांग्याच्या झाडाची
शेंडे व फळे पोखरणारी अळी व सुत्रकृमीपासून पिकाचे संरक्षण होते.
Comments
Post a Comment