बेरोजगार युवक-युवतींच्या मदतीसाठी मार्गदर्शन तथा समुपदेशन कक्ष - पालकमंत्री शंभूराज देसाई




वाशिम, दि. २९ (जिमाका) : लॉकडाऊन काळात जिल्ह्यात परतलेल्या बांधवांना त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यानुसार खासगी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींची माहिती मिळणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन केंद्राच्यावतीने तयार केलेल्या गुगल फॉर्मआणि व्यवसाय मार्गदर्शन तथा समुपदेश कक्षाची मदत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन केंद्राच्यावतीने तयार करण्यात आलेल्या गुगल फॉर्मआणि व्यवसाय मार्गदर्शन तथा समुपदेश कक्षाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, लॉकडाऊन काळात जिल्ह्यात परतलेल्या युवक-युवतींचा रोजगार व स्वयंरोजगाराबाबत कल जाणून घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'गुगल फॉर्म'वर युवक-युवतींनी आपल्याकडे असलेली कौशल्ये विषयक माहिती भरावी. त्याआधारे खासगी क्षेत्रात उपलब्ध संधीची माहिती त्यांना पुरविण्यात येईल.
स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी इच्छूक जिल्ह्यातील युवक-युवतींना स्वयंरोजगाराची क्षेत्रे, प्रकल्प अहवाल तयार करण्याची पद्धत, विविध शासकीय महामंडळाच्या योजना, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे याबाबत सविस्तर माहिती व्यवसाय मार्गदर्शन तथा समुपदेशन कक्षाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होईल, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.
लॉकडाऊन काळात जिल्ह्यात परतलेल्या वाशिम जिल्ह्यातील १५ ते ४५ वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन केंद्राच्यावतीने तयार केलेल्या गुगल फॉर्मभरण्यासाठी ९६६५५२५६५१ या व्हाटसअप क्रमांकावर लिंक प्राप्त करून घेण्यासाठी रिक्वेस्ट पाठवावी, असे श्रीमती बजाज यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे