‘मुद्रा’मुळे रणजित झाला स्वावलंबी…




बेरोजगारीचे प्रमाण आज प्रचंड वाढले आहे. या वाढत्या बेरोजगारीमुळे सर्वांनाच रोजगार उपलब्ध करून देणे आज कठीण झाले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून बेरोजगार व गरजू व्यक्ती हा स्वावलंबी व्हावा, हे पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात साकारतांना दिसत आहे. वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर येथील रणजित देवळे हा शिक्षीत तरुण मुद्रा योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी झाला आहे.
रणजित... तसा भूमिहीन. घरी वडिलोपार्जित शेती नसल्यामुळे रणजितने ग्रामपंचायत जवळ सरकारी जमिनीवर केवळ १० हजार रुपयांची गुंतवणूक करून सन २००० मध्ये छोटे किराणा दुकान थाटून व्यवसायाला सुरुवात केली. आई, वडील, पत्नी व एका मुलासह संसाराचा गाडा चालविण्याची जबाबदारी रणजितवर आली. निर्व्यसनी असलेला रणजित सुस्वभावी असल्यामुळे ग्राहक देखील त्याच्या दुकानातून किराणा खरेदी करू लागले. दिवसाला या व्यवसायातून त्याला सुमारे १८० रुपये नफा मिळू लागला. केवळ याच व्यवसायात समाधान न मानता काहीतरी जोडधंदा केला पाहिजे, हा विचार सतत रणजितच्या मनात घर करू लागला. पार्डी टकमोर हे गाव परिसरातील ८ ते १० गावांची बाजारपेठ असल्यामुळे येथे कामानिमित्त लोक मोठ्या प्रमाणात येतात, हे लक्षात घेऊन रणजितने किराणा व्यवसायासोबतच कोल्ड्रिंक्स विक्री तसेच झेरॉक्स मशिनचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. परंतू आपल्याकडे ऐवढा पैसा नसल्यामुळे पैसा आणायचा तरी कोठून हा प्रश्न त्याला पडला.
गरजू व बेरोजगार व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु केल्याची माहिती टीव्हीवर कार्यक्रम एकदा पाहतांना रणजितने बघितली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गावात असलेल्या विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक श्री. राऊत यांची बँकेत भेट घेतली. मुळातच प्रामाणिकपणे आणि मेहनतीने किराणा व्यवसाय करीत असल्यामुळे बँक व्यवस्थापक श्री. राऊत यांनी देखील रणजितच्या व्यवसायाला हातभार लावण्यासाठी पुढाकार घेतला. त्याला प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतील शिशू गटातून ५० हजार रुपये सप्टेंबर २०१५ मध्ये मंजूर केले. या पैशातून रणजितने किराणा व्यवसायासोबतच कोल्ड्रिंक्स विक्री करण्यासाठी फ्रीज खरेदी केला. विविध नामांकित कंपन्यांची शीतपेय, पाणी बॉटल, पाणी पाऊचची विक्री सुरु केली. गावात लग्न प्रसंगाला येणारे वऱ्हाडी व उन्हाळ्याच्या दिवसात तर ग्राहक मोठ्या प्रमाणात शीतपेयाची मागणी करतात. तसेच आजूबाजूच्या गावातील लोक कामानिमित्त गावात येत असल्यामुळे किराणासोबत हा व्यवसाय देखील चांगला चालतो. तसेच झेरॉक्स मशीन सुद्धा खरेदी केल्यामुळे अनेक जण विविध कागदपत्रांच्या झेरॉक्स काढण्यासाठी दुकानात येतात. मुद्रा बँक योजनेतून विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या पार्डी टकमोर शाखेने दिलेल्या कर्जाची परतफेड एका वर्षातच केल्यामुळे बँकेने पुन्हा मुद्रा योजनेतून कर्ज दिले.
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतून रणजित सारख्या गरजू व्यक्तीला कर्ज मिळाल्यामुळे तो आज स्वावलंबी जीवन जगत आहे. सध्या त्याला या व्यवसायातून दिवसाला सुमारे ४०० रुपये नफा मिळत आहे. भविष्यात या दुकानातून चहा कॅन्टीन, ऑनलाईन सुविधा केंद्र सुरु करण्याचा विचार असल्याचे रणजितने सांगितले. मुलाला चांगले शिक्षण देवून त्याला चांगला अधिकारी बनविण्याचे आपले स्वप्न असल्याचेही रणजित म्हणाला.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे