शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी बोंड अळी सर्वेक्षणासाठी कामगंध सापळ्यांचा ( फेरेामोन ट्रॅप) वापर करण्याचे आवाहन


          वाशिम दि. 26 :  शेंदरी बोंडअळी या पतंगवर्गीय किटकाची मादी एक विशिष्ठ प्रकारचा गंध वातावरणामध्ये सोडते त्यामुळे नर कीटक मादीकडे आकर्षित होतात. या तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतामधील नर पंतग पकडण्यासाठी फेरेामोन सापळे लावून मोठ्या प्रमाणात नर पंतग पकडण्यात येतात. त्यामुळे पुढील प्रजनन रोखण्यात मदत होते. या कीडींच्या संख्येचा अंदाज येण्यासाठी फेरोमोन ट्रॅप अर्थात कामगंध सापळे महत्वाचे साधन आहे. फेरोमोन सापळ्यात सलग तीन दिवस प्रति दिन 8 ते 10 नर आढळून आल्यास किटकनाशकांचा वापर करणे आवश्यक असते. जुलै मध्यानंतर कापसाचे पीक, पाते, फुले लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो.
गुलाबी अळीचे जीवन चक्र खंडित करण्यासाठी व प्रादुर्भाव तात्काळ लक्षात येण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर प्रभावी ठरतो. या सापळ्यांचा वापर, कपाशी लागवडीपासून 45 दिवसांनी केल्यास किडीची संख्या लक्षात येते व त्यानुसार योग्य किटकनाशकांचा योग्यवेळी व योग्य प्रमाणात वापर करुन ही कीड नियंत्रणात येऊ शकते. फेरोमोन सापळ्यांच्या अभावी सुरवातीच्या अवस्थेत किडीचा प्रादुर्भाव लक्षात न येण्याची शक्यता असते त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव उशिरा लक्षात आल्यास किटकनाशके सुध्दा प्रभावी ठरत नाहीत.
            मागील वर्षीच्या खरीप हंगामात कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले होते. मागील आडवड्यामध्ये यवतमाळ, अमरावती, व वर्धा या परिसरातील जिनींग मिलमध्ये लावलेल्या कामगंध सापळ्यांमध्ये गुलाबी बोंडअळीचे पंतग आढळले आहेत. या कीडीच्या अवस्था जसे अळी, कोश आणि पंतग कापसाच्या मिल मध्ये आढळून येतात. यामुळे ही कीड नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहेत. जिनींग मिल परिसरात किमान 5 कामगंध सापळे जिनींग मिल मध्ये लावावेत. या सापळ्यामध्ये जमा होणाऱ्या पतंगांची संख्या दररोज मोजून अडकलेले पतंग नष्ट करावेत.
            कपाशी पिकामध्ये सर्वेक्षणासाठी एकरी दोन सापळे तर कपाशी जिनींग मिल परिसरात किमान पाच सापळे लावावेत. कापसाच्या पिकापेक्षा सापळा एक फुट उंचीवर राहील अशी काळजी घ्यावी. गुलाबी बोंड अळी साठी पेक्टीनो-ल्युरचा वापर करावा. ल्यूर कंपनीपरत्वे निर्देशित कालावधीनुसार 20 अथवा 45 दिवसांपर्यंत वापरता येते. या कालावधी नंतर ल्यूर बदलणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया नोव्हेंबर अखेरर्पंत राबवावी. आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास सुरुवातीला 5 टक्के निंबोळी अर्काचा वापर करावा. निंबोळी उपलब्ध नसल्यास अझोडिरेक्टिन 300 पीपीएम (100 मिली) किंवा अझोडिरेक्टिन 1500 पीपीएम (50 मिली ) किंवा अझोडिरेक्टिन 50000 पीपीएम 5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यानंतरही प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर आढळून आल्यास प्रढीलप्रमाणे किटकनाशकाचा वापर करावा. क्लोरापायरीफॉस 50 ईसी-20 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मिली किंवा थायोडीकार्ब 75 डब्लूपी-20 ग्रॅम या कीटकनाशकांची 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
            महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ यांचे तालुका स्तरावरील अधिकृत विक्रेते यांचेकडे हे कामगंध सापळे विक्रीसाठी उपलब्ध  करण्यात आले आहेत या कामगंध सापळ्यांचा शेतकरी बांधवांनी प्रभावीपणे वार केल्यास त्यांच्य परिसरामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची बाब लक्षात येणार आहे. आणि त्यामुळे गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करणे सोपे होईल, असे कृषि विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे