आता ऑनलाईन करता येणार पीक कर्जाची नोंदणी
·
वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाने
तयारी केली वेबसाईट
·
पीक कर्जाविषयी नोंदणीसाठी राज्यातील
पहिलाच उपक्रम
·
पीक कर्ज वाटपाच्या अनुषंगाने
सनियंत्रण करणे होणार सोपे
·
शेतकरी व बँकेमध्ये समन्वय
साधण्यासाठी प्रयत्न
वाशिम, दि. ०८ : पीक कर्ज वाटपामध्ये
सुसूत्रता आणण्यासाठी तसेच पीक कर्ज वाटपाला गती देण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना
आपल्याला आवश्यक पीक कर्जासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा जिल्हाधिकारी
कार्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन स्वरुपात पीक कर्ज मागणी नोंदविल्यानंतर
शेतकऱ्यांना टोकन क्रमांक व त्या कर्जासाठी कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे,
याविषयी माहिती त्याच्या मोबाईलवर दिली जाणार आहे. तसेच त्यांच्या अर्जाविषयी
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सनियंत्रण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी
लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला
निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या www.collectorwashim.in या संकेतस्थळावर
जिल्ह्यातील कोणताही शेतकरी मोबाईल अथवा संगणकाद्वारे कोणत्याही ठिकाणाहून पीक कर्जाची
मागणी ऑनलाईन स्वरुपात नोंदवू शकणार आहे. यावेळी शेतकऱ्यांना स्वतःचे नाव, पत्ता,
आधारकार्ड क्रमांक, जमिनीचा तपशील, तसेच आवश्यक कर्ज आदी माहिती भरावी लागेल.
कोणत्या बँकेकडून तसेच कोणत्या शाखेतून व किती पीक कर्ज आवश्यक आहे, याची माहिती
सुध्दा भरावी लागेल. अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्याला या कर्जासाठी कोणती कागदपत्रे
आवश्यक आहेत, याची माहिती दिली जाईल. तसेच बँकेलाही संबंधित शेतकऱ्याची कर्ज मागणी
ऑनलाईन कळविली जाईल. आवश्यक कागदपत्रे घेऊन शेतकऱ्यांना संबंधित बँकेत जावे लागेल.
ऑनलाईन नोंदणी
केल्यानंतर शेतकऱ्यांना बँकेत जावून बँकेचा विहित नमुन्यातील अर्ज व कागदपत्रे जमा
करावी लागतील. त्यानंतर त्या अर्जावर बँकेने कोणती कार्यवाही केली, याबाबत
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठपुरावा केला जाणार आहे. बँकेने कर्ज नाकारल्यास,
त्याविषयीचे कारण नमूद करणे बँकेला बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे एखाद्या बँकेकडे
प्राप्त झालेले अर्ज व त्यापैकी किती जणांना पीक कर्ज वाटप झाले, किती जणांना कर्ज
नाकारले, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सनियंत्रण केले जाणार आहे.
पीक कर्ज वाटपाच्या
अनुषंगाने येणाऱ्या तक्रारींचे स्वरूप पाहून हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.
प्रत्येक पात्र शेतकऱ्याला स्केल ऑफ फायनान्सनुसार पीक कर्ज मिळावे, त्याच्याकडे
बँकेने कोणत्याही अनावश्यक कागदपत्रांची मागणी करू नये, यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी
हे संकेतस्थळ आहे. त्यामुळे पीक कर्जासाठी इच्छुक जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या
संकेतस्थळावर पीक कर्जासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण
मिश्रा यांनी यावेळी केले आहे.
पीक विम्याचे पैसे
कर्ज खात्यात जमा करू न करण्याच्या सूचना
पीक विमा भरपाई म्हणून शेतकऱ्यांना मंजूर झालेले पैसे
बँकांनी कर्ज खात्यात जमा केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर
तातडीने सर्व बँकांना लेखी आदेश देऊन पीक विम्याची रक्कम कर्ज खात्यात जमा न करता,
ती बचत खात्यात जमा करण्याच्या सूचना दिल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा
यांनी यावेळी सांगितले.
Comments
Post a Comment