पीक कर्जविषयक तक्रारींचा तातडीने निपटारा करा - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा
·
खरीप पीक कर्ज वाटप आढावा बैठक
वाशिम, दि. ०४ : खरीप पीक कर्ज वाटपाच्या अनुषंगाने तक्रारींसाठी जिल्हा
प्रशासनाने दिलेल्या हेल्पलाईन क्रमांक व ई-मेलवर शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त
झाल्या आहेत. सदर तक्रारी संबंधित बँकांकडे पाठविल्या जात आहेत. या तक्रारींचा
बँकांनी तातडीने निपटारा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा
यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खरीप पीक कर्ज वाटप आढावा
बैठकीत ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके,
जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास प्रबंधक
विजय खंडरे यांच्यासह बँकांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. मिश्रा
यांनी यावेळी जिल्ह्यातील बँकांनी आतापर्यंत वाटप केलेल्या पीक कर्जाची माहिती
घेतली. तसेच यापूर्वी बँकांकडे पाठविण्यात आलेल्या तक्रारींवर बँकांनी केलेल्या
कार्यवाहीचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला तातडीने पीक
कर्ज उपलब्ध करून देण्याची भूमिका प्रत्येक बँक अधिकाऱ्याने घ्यावी. पीक कर्जासाठी
आवश्यक असलेल्या किमान कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शेतकऱ्यांना कोणतीही
अनावश्यक कागदपत्रे न मागता त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. शेतकऱ्यांच्या पीक कर्जविषयक
तक्रारी संबंधित बँकेतच सोडविल्या जाणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व बँकांनी
स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. प्रत्येक
शेतकऱ्याला स्केल ऑफ फायनान्सनुसार कर्ज वाटप केले जावे, कोणत्याही बँकेने स्केल
ऑफ फायनान्सपेक्षा कमी कर्ज देऊन नये. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ
मिळावा, यासाठी सर्व बँकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Comments
Post a Comment