पीक कर्जाची नोंदणी ‘ऑनलाईन’ करण्याची सुविधा


·        आवश्यक कागदपत्रांची माहिती मिळणार मोबाईलवर
·        कर्ज नाकारल्यास बँकेला द्यावे लागणार स्पष्टीकरण
·        शेतकऱ्यांना कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा
वाशिम, दि. १९ : पीक कर्ज वाटपामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच पीक कर्ज वाटपाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना आपल्याला आवश्यक पीक कर्जासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा जिल्हाधिकारी कार्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार बँकेत हेलपाटे मारण्याची आवश्यकता राहणार नाही. ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्याला बँकेने कर्ज नाकारल्यास त्याबाबतचे स्पष्टीकरण बँकेला द्यावे लागणार आहे. या सुविधेमुळे पीक कर्जासाठी कोण-कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरच मिळणार आहे. तसेच बँकेकडून या व्यतिरिक्त अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली जाणार नाही.
पीक कर्जाच्या ऑनलाईन नोंदणीसाठी सुरु करण्यात आलेल्या www.collectorwashim.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना आपले नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, बचत खाते विषयक माहिती, आधार क्रमांक, त्यांच्याकडे असलेली शेतजमीन यासोबतच आवश्यक कर्ज, सदर कर्ज कोणत्या बँकेतून पाहिजे यासह इतर माहिती भरून नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केल्यानंतर टोकन क्रमांक व त्या कर्जासाठी कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे, याविषयी माहिती शेतकऱ्यांना त्याच्या मोबाईलवर मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी कर्ज घेण्यासाठी जी बँक निवडली आहे, त्या बँकेकडे ऑनलाईन स्वरुपात शेतकऱ्याची कर्ज मागणी नोंदविली जाणार आहे.
ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मोबाईलवर प्राप्त झालेल्या संदेशानुसार आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित शेतकऱ्याने आपण निवडलेल्या बँकेत संपर्क साधावा. यावेळी बँकेतील विहित नमुन्यातील अर्ज भरून देणे व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. या अर्जावर बँकेकडून पुढील कार्यवाही करून पीक कर्ज मंजूर केले जाईल. एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज काही कारणास्तव नामंजूर करण्यात आल्यास त्याविषयीचे स्पष्टीकरण बँकेला पीक कर्जविषयक संकेतस्थळावर द्यावे लागणार आहे. कर्ज नाकारण्याचे कारण अयोग्य असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बँकेकडे पाठपुरावा केला जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होणार ऑनलाईन अर्जांचे संनियंत्रण
पीक कर्ज विषयक अर्जाची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होणार आहे. त्यानुसार प्राप्त झालेले अर्ज तसेच बँकांनी कर्ज मंजूर अथवा ना मंजूर केलेले अर्ज, याविषयीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेतला जाणार आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटपाबाबत संनियंत्रण करणे शक्य होणार आहे.
पीक कर्ज विषयक तक्रारी ई-लोकशाही कक्षात नोंदवा
            जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या पीक कर्ज नोंदणी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या अर्जावर बँकेने कोणती कार्यवाही केली, याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला ऑनलाईन मिळणार आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटप गतिमान होण्यास मदत होईल. तरीही पीक कर्जाविषयी तक्रार असल्यास त्या जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरु केलेल्या ‘ई-लोकशाही कक्षात’ नोंदवावी.  याकरिता शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. elokshahiwashim@gmail.com या ई-मेलवर अथवा ८३७९९२९४१५ या व्हाटसअप क्रमांकवर किंवा ०७२५२-२३११२० या दूरध्वनी क्रमांकावर शेतकरी आपली तक्रार नोंदवू शकतात. या तक्रारीविषयी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठपुरावा केला जाणार आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे