शेतीपूरक व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करा - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा
·
‘आत्मा’च्या नियामक
मंडळाची आढावा बैठक
·
शेतीमधील
प्रात्यक्षिक, शेतकरी प्रशिक्षणाच्या नियोजनाबाबत चर्चा
·
दुग्ध व्यवसाय,
शेळीपालनविषयक प्रशिक्षण आयोजित करण्याच्या सूचना
वाशिम, दि. ११ : शेतीला
पूरक जोडधंदा निर्माण झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल. त्यामुळे ‘आत्मा’च्या
माध्यमातून दुग्ध व्यवसाय, शेळीपालन यासारख्या व्यवसायाच्या वाढीसाठी प्रयत्न
करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज झालेल्या ‘आत्मा’
नियामक मंडळाच्या बैठकीत दिल्या.
यावेळी
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा अधीक्षक
कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडरे,
जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपविभागीय
अधिकारी के. आर. राठोड, करडा कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. आर. एल. काळे, ‘आत्मा’च्या
प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांच्यासह
तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीचे प्रतिनिधी व विविध विभागांचे अधिकारी
उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
श्री. मिश्रा म्हणाले, ‘आत्मा’ने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी
प्रशिक्षण, प्रात्यक्षिक यासाठी आपली मागणी नोंदविली आहे. यामध्ये दुग्धव्यवसाय,
शेळी पालन, कुक्कुटपालन आदी शेती पूरक व्यवसायाचाही समावेश आहे. या व्यवसायाचे
प्रशिक्षण ‘आत्मा’मार्फत आयोजित करण्याचे नियोजन करावे. तसेच या व्यवसायासाठी
आवश्यक बाबी शेतकऱ्यांना कोणत्या ठिकाणी प्राप्त होतील, त्यासाठी शासकीय योजनेचा
लाभ घेता येईल का, याविषयी सुद्धा त्यांना मार्गदर्शन केले जावे. केवळ प्रशिक्षण
देऊन न थांबता संबंधित शेतकऱ्याला सदर व्यवसाय उभारणीसाठी पूर्णतः मार्गदर्शन करण्याच्या
दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
हळद
लागवड, मधुमक्षिका पालन, रेशीम शेती आदीबाबत सुध्दा शेतकऱ्यांनी प्रशिक्षण
देण्याची मागणी केली आहे. त्यादृष्टीने नियोजन करावे. तसेच याबाबींसाठी आवश्यक बियाणे,
साहित्य शेतकऱ्यांना कुठे उपलब्ध होईल, तसेच उत्पादित माल विक्रीसाठी बाजारपेठ
कुठे उपलब्ध होऊ शकेल, याची माहिती सुध्दा शेतकऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान दिली
जावे, असे जिल्हाधिकारी श्री. मिश्रा यांनी सांगितले. यापूर्वी नियामक मंडळाच्या
बैठकीत उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचाही यावेळी आढावा
घेण्यात आला.
*****
सोबत फोटो.
Comments
Post a Comment