जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे १५ सप्टेंबर पूर्वी पूर्ण करा पालकमंत्री संजय राठोड जिल्हास्तरीय समिती बैठक संपन्न

जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे १५ सप्टेंबर पूर्वी पूर्ण करा
                पालकमंत्री संजय राठोड

जिल्हास्तरीय समिती बैठक संपन्न

वाशिम दि.१२ ऑगस्ट (जिमाका) संत सेवालाल महाराज पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि पोहरादेवी व उमरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांचे सुधारित अंदाजपत्रके तयार करण्याचे तत्वत: मंजुरी घ्यावी. भुसंपादन करायची असल्यास तात्काळ कार्यवाही करावी. पुढील महिन्यात १५ सप्टेंबर पर्यंत कोणत्याही परिस्थितीत दोन्ही आराखड्यातील कामे पूर्ण करावी.असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.
    आज दि.१२ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात कारंजा येथील गुरू मंदीर, पोहरादेवी, उमरी येथील दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांचा आढावा आयोजित सभेत श्री राठोड यांनी घेतला.यावेळी ते बोलत होते.सभेला जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार भावना गवळी, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस,जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस,अपर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, वाशिम तहसीलदार निलेश पळसकर, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. 
          पालकमंत्री श्री राठोड म्हणाले, दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आराखडे त्वरित अंतिम करून जिल्हाधिकारी यांना दाखविण्यात यावे.आराखडे तयार करताना दूरदृष्टीने त्यामध्ये वाहन पार्किंग,पिण्याचे पाणी व विद्युत व्यवस्था यांचा समावेश करावा.आराखड्यातील कामांचे व्यवस्थापन व स्वच्छता कायम राहील याबाबतचा देखील आराखड्यात समावेश करण्यात यावा.दोन्ही विकास आराखडयासाठी जी शासकीय जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे, त्यावर असलेली अतिक्रमणे त्वरित हटवून जागा खुली करण्यात यावी. विकास आराखड्यातील समाधी व मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर आणि भक्तनिवास ठिकाणी आवश्यक असलेल्या जागेवर चांगले प्रवेशद्वार तयार करण्यात यावे, असे ते म्हणाले.
 १५ सप्टेंबर २०२४ रोजी श्री संत सेवालाल महाराज नगारा म्युझियमचे लोकार्पण करणे नियोजित आहे. त्याकरिता
म्युझियमच्या बाह्य परिसरातील सर्व कामे तात्काळ पूर्ण करावी.बाह्य परिसरातील लँडस्केपिंग व वृक्ष लागवडीची कामे अद्यापही सुरू झालेली नाही. त्यातील अडचणी दूर करून कामे तात्काळ सुरु करावी.म्युझियम मधील सर्व गॅलरींचे सजावटीकरणाचे काम ३१ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करून व त्याची ट्रायल घेऊन अंतिम करावे. याकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व बाबीची पूर्तता संबंधित कन्सल्टंट, पीएमसी यांचेकडून बांधकाम विभागाने जातीने लक्ष घालून करून घ्यावी. म्युझियमच्या फायर चे काम १० सप्टेंबर पर्यंत पूर्ण करून अग्निशमन विभागाची अंतिम एनओसी घेण्यात यावी.मुझियम व परिसरातील सर्व कामे पूर्ण करण्यात असलेल्या अडचणी तात्काळ दूर करून कामे पूर्ण करावी. यामध्ये दिरंगाई अथवा निष्काळजीपणा आढळून आल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल.
नगारा म्युझियमचे परिचालन, देखभाल व दुरुस्ती करिता आवश्यक व्यवस्था करण्यात यावी.हाय स्पीड इंटरनेट साठी बीएसएनएल कडून टॉवर उभारण्याची कारवाई करावी. श्री संत सेवालाल महाराज व इतर सर्व समाधी स्थळांचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करावी.
          यावेळी श्रीमती बुवनेश्वरी एस यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आराखडयाअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामाची माहिती दिली.यावेळी आराखड्याशी संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी व संबंधित वास्तुविशारद उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश