यंत्रणांनी गुणवत्तापूर्ण कामे करून जिल्ह्याच्या विकासाला गती द्यावी पालकमंत्री संजय राठोड जिल्हा नियोजन समिती सभा
यंत्रणांनी गुणवत्तापूर्ण कामे करून जिल्ह्याच्या विकासाला गती द्यावी
पालकमंत्री संजय राठोड
जिल्हा नियोजन समिती सभा
३७२ कोटीच्या सन २०२३-२४ च्या मार्चअखेर खर्चास मंजुरी
सन २०२४-२५ मधील सद्यस्थितीचा घेतला आढावा
माहे जुलै अखेर ४ कोटी १४ लक्ष रुपये वितरित
वाशिम,दि. १२ ऑगस्ट (जिमाका) जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी विविध यंत्रणांना निधी उपलब्ध करून देण्यात येतो.यंत्रणांनी निर्धारित वेळेत निधी खर्च करून गुणवत्तापूर्ण कामे करून जिल्ह्याच्या विकासाला गती द्यावी. तसेच प्रलंबित असलेल्या कामांना प्राधान्य देवून तात्काळ पूर्ण करावीत. असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.
आज १२ ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली.यावेळी अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री श्री. राठोड बोलत होते. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार संजय देशमुख, अनुप धोत्रे,आमदार श्रीमती भावना गवळी, आमदार लखन मलिक,अमित झनक, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे व पोलीस अधीक्षक अनुज तारे, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री.राठोड म्हणाले, शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी जलजीवन मिशनच्या माध्यमातून घरोघरी उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबण्यास मदत होईल. या योजनेसाठी निधीची कमतरता पडल्यास शासनाकडे मागणी करून निधी उपलब्ध करून घेण्यात येईल. प्रस्तावित नवीन व सुरू असलेल्या प्रशासकीय इमारतीची कामे करताना ती गुणवत्तापूर्ण असावी. तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांना "क" दर्जा देण्याबाबतचे प्रस्ताव मंजुरीसाठी समितीकडे सादर करावे. रस्ता दूरूस्तीची व बांधकामाची प्रलंबित कामे पूर्ण करावे असे निर्देश संबंधितांना दिले.
जिल्ह्याच्या तसेच तालुक्याच्या ठिकाणी विविध खेळाच्या खेळाडूंसाठी सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुले असली पाहिजे असे सांगून पालकमंत्री श्री.राठोड पुढे म्हणाले,या सुविधांमुळे विविध क्रीडाक्षेत्रात जिल्ह्यातील खेळाडू जिल्ह्याचे नाव कमावेल. क्रीडा संकुलात असलेल्या उणिवा दूर करून आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी महावितरण कंपनीने रोहित्र लावावे. आवश्यकता पाहून कमी दाबाचे रोहीत्र बदलून घ्यावे.शेतकऱ्यांना आवश्यक तेवढा वीज पुरवठा केल्यास सिंचनासाठी अडथळा येणार नाही. जिल्ह्यासाठी किती रोहित्राची आवश्यकता आहे, याची माहिती महावितरणाने द्यावी.नादूरूस्त रोहीत्र तात्काळ सुधारून घ्यावी.टप्प्याटप्प्याने रोहित्रासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.जिल्ह्यातील ज्या रस्त्याची कामे करायची आहे त्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करून जिल्हा नियोजन समितीचा निधी देण्यात येईल.जिल्ह्यातील जे रस्ते खराब झाले आहे,त्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करावा. सर्वाधिक खराब व नादुरुस्त असलेल्या रस्त्याची कामे प्राधान्याने सुरू करावी. वाशिम शहरातील बंद असलेली वाहतूक सिग्नल एका आठवड्याच्या आत सुरू करावे. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी केलेला सूचनावर कार्यवाही करण्यात येईल असे पालकमंत्री श्री.राठोड यावेळी म्हणाले.
जि.प.अध्यक्ष श्री. ठाकरे म्हणाले, जिल्ह्यातील पांदण रस्त्याच्या कामासाठी निधी मिळाला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुविधा निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार श्री.देशमुख म्हणाले, वाशिम हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण आहे. रस्त्यांची कामे मार्गी लावावीत. सिग्नल यंत्रणा सुरू करावी. मागील काळात झालेले नुकसान भरपाई देण्यात यावी. शेतकऱ्यांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात.असेही ते म्हणाले. पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल हे बघावे.
आमदार गवळी म्हणाल्या,जिल्हा व सर्व तालुका क्रीडा संकुलामध्ये खेळाडूंना सुविधा मिळाल्या पाहिजे. सुविधा मिळाल्या तरच खेळाडू स्पर्धेत व विविध विभागाच्या परीक्षेचे यश संपादन करतील.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेसा सिंचनासाठी वीजपुरवठा उपलब्ध झाला पाहिजे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषीविषयक योजनांचा लाभ घेता येईल असे त्या म्हणाल्या.
आमदार झनक यांनी पीक विम्याचे अग्रीम विमा कंपनीने कबूल केले, पण अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रीम रक्कम जमा करण्यात आलेली नाही. ती रक्कम त्वरित जमा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी पालकमंत्र्यांकडे केली.नादुरूस्त अवस्थेत असलेले पर्जन्यमापक यंत्र तात्काळ दुरूस्ती करून घ्यावी. मातोश्री पांदन रस्ते, स्व. गोपीनाथ मुंडे या योजनेतील कामांचा आढावा सभेत घेण्यात आला.
विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या बँका खात्यात नुकसान भरपाईची अग्रीम रक्कम जमा करण्यात येईल असे जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यावेळी म्हणाल्या.
दरम्यान सुरूवातीला मागील बैठकीच्या इतिवृत्ताचे वाचन करून अनुपालन करण्यात आले.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२३-२४ योजना निहाय खर्चाचा गोषवा-याची प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर यांनी यावेळी दिली. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनु.जाती उपयोजना , आदिवासी उपयोजना यामध्ये ३११ कोटी ६४ लक्ष मंजूर नियतव्यय होता. हा
१०० टक्के खर्च झाला आहे.
२०२४-२५ मध्ये एकुण ३७२ कोटी रुपये २१ लक्ष असून जुलै २०२४ अखेर ४ कोटी १४ लक्ष रुपये निधी जुन्या कामांसाठी यंत्रणांना वितरित करण्यात आला आहे.
प्रारंभी विधानसभा सदस्य स्व. राजेंद्र पाटणी यांना समितीच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. मानोरा येथील पोलिस पाटील वासुदेव सोनोने यांना विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार २०२४ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
सभेला समितीचे सदस्य मीनाक्षी पट्टेबहादूर,शोभा शेगावकर, कल्पना राऊत, कांचन मोरे,अर्चना कोरणे,नीलिमा देशमुख,सुजाता देशमुख,मयुरी पाकधने, चंद्रशेखर डोईफोडे,अरविंद इंगोले,,दिलीप देशमुख,डॉ.सुधीर कव्हर,उमेश ठाकरे, सुनील चंदनशिवे, अमित खडसे,संध्या देशमुख, महादेव ठाकरे, रवी भांदुर्गे, बाळासाहेब नगराळे ,माधवी झनक आदींची उपस्थिती होती. सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment