जिल्ह्यात शनिवारी २१ उपकेंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्वपरीक्षा

·         ६७४४ उमेदवार देणार परीक्षा

वाशिम, दि. ०२ (जिमाका) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब  पूर्वपरीक्षा-२०२० शनिवार, ४ सप्टेंबर २०२१ रोजी वाशिम शहरातील १५ व मंगरूळपीर शहरातील ६ अशा जिल्ह्यातील एकूण २१ परीक्षा उपकेंद्रांवर सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातून ६७४४ परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत.

वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय, माउंट कारमेल इंग्लिश स्कूल, श्री शिवाजी विद्यालय, श्री तुळशीराम जाधव कला व विज्ञान महाविद्यालय, सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालय, एस. एम. सी. इंग्लिश स्कूल, हॅपी फेसेस हायस्कूल, श्री. बाकलीवाल विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, रेखाताई राष्ट्रीय कन्या विद्यालय, शासकीय तंत्र निकेतन, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय, श्रीमती मालतीबाई सरनाईक कन्या शाळा, सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय यासह मंगरूळपीर शहरातील यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, यशवंतराव चव्हाण विद्यालय, कलंदरिया उर्दू हायस्कूल, यशवंतराव चव्हाण इंग्लिश हायस्कूल, सिद्धार्थ विद्यालय या २१ उपकेंद्रांवर ही परीक्षा होत आहे.

परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र परीक्षार्थींनी स्वतः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावे. परीक्षेस येताना प्रवेशपत्रासोबतच स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट किंवा वाहन चालविण्याचा परवाना (फक्त स्मार्टकार्ड प्रकारचा) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र व त्याची एक झेरॉक्स प्रत सोबत आणावी व ती स्वतःच्या स्वाक्षरीसह (सेल्फ अटेस्टेड) समवेक्षकाकडे जमा करणे अनिवार्य आहे. उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश प्रमाणपत्र, काळा शाईचा पॉईंट पेन, मूळ ओळखपत्र व त्याची छायांकित एक प्रत इत्यादी साहित्य सोबत आणण्याची मुभा राहील. या व्यतिरिक्त इतर कोणतेही साहित्य उमेदवारांना सोबत बाळगता येणार नाही. उमेदवारांना एकदा परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश दिल्यानंतर परीक्षा संपेपर्यंत परीक्षा केंद्राबाहेर जाता येणार नसल्यामुळे उमेदवारांनी पाणी बॉटल सोबत आणावी.

कोविड-१९ विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या आपत्ती व्यस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार उमेदवारांना वैध प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे परीक्षेकरिता प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. परीक्षेकरिता बसलेल्या उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये मोबाईल फोन, पेजर, इतर दूरसंचार साधने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे अथवा दूरसंचारासाठी वापरण्यात येणारी कोणतीही संपर्क साधने, पुस्तके, पेपर्स, अथवा परिगणक (कॅल्क्युलेटर) इत्यादी प्रकारचे अनधिकृत साहित्य जवळ बाळगण्यास अथवा त्याचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सदरची बाब निदर्शनास आल्यास अशा उमेदवारांवर कडक कार्यवाही करण्यात येईल.

विद्यार्थ्यांनी वेळेवर परीक्षा उपकेंद्रावर पोहोचावे. विलंबाने आलेल्या विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीत परीक्षेला बसता येणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही. अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक किंवा अर्जात नमूद ई-मेल आयडी यापैकी कोणताही एक तपशील नमूद करून प्रवेश प्रमाणपत्राचा तपशील पाहता येईल. तसेच प्रवेश प्रमाणपत्र डाऊनलोड व प्रिंट करता येईल. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड व प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.

११ एप्रिल २०२१ रोजी नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० करिता दिनांक ५ एप्रिल २०२० रोजी २०२१ रोजी उपलब्ध करून देण्यात आलेले प्रवेश प्रमाणपत्र ४ सप्टेंबर २०२१ रोजी नियोजित परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही. ११ एप्रिल २०२१ रोजीच्या परीक्षेच्या प्रवेश प्रमाणपत्रासह उपस्थित होणाऱ्या उमेदवारांना प्रवेश नाकारण्यात येईल. परीक्षेच्या दिवशी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेवून परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्यापूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सुचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे. आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘उमेदवारांना सर्वसाधारण सूचना’, प्रवेशपत्रावरील दिलेल्या सूचनांचे परीक्षेच्या वेळी शारीरिक तथा परस्पर अंतराच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही, उपाययोजना संदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार, तसेच प्रचलित नियम, कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. प्रवेश प्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact-secretary@mpsc.gov.in support.online@mpsc.gov.in या ई-मेल अथवा १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरून विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करून घेता येईल, असे परीक्षा केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे