महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्वपरीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

 


वाशिम, दि. ०१ (जिमाका) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्वपरीक्षा-२०२० शनिवार, ४ सप्टेंबर २०२१ रोजी वाशिम शहरातील १५ व मंगरूळपीर शहरातील ६ अशा जिल्ह्यातील एकूण २१ परीक्षा उपकेंद्रांवर सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. या २१ परीक्षा उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय, माउंट कारमेल इंग्लिश स्कूल, श्री शिवाजी विद्यालय, श्री तुळशीराम जाधव कला व विज्ञान महाविद्यालय, सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालय, एस. एम. सी. इंग्लिश स्कूल, हॅपी फेसेस हायस्कूल, श्री. बाकलीवाल विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, रेखाताई राष्ट्रीय कन्या विद्यालय, शासकीय तंत्र निकेतन, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय, श्रीमती मालतीबाई सरनाईक कन्या शाळा, सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय यासह मंगरूळपीर शहरातील यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, यशवंतराव चव्हाण विद्यालय, कलंदरिया उर्दू हायस्कूल, यशवंतराव चव्हाण इंग्लिश हायस्कूल, सिद्धार्थ विद्यालय या उपकेंद्रांवर ही परीक्षा होत आहे.

या सर्व परीक्षा उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्यामुळे परीक्षा उपकेंद्रांवर ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही. उपकेंद्राच्या १०० मीटर परिक्षेत्रात केंद्राधिकारी, पर्यवेक्षक, समवेक्षक, सहाय्यक कर्मचारी, परीक्षार्थी, परीक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडून नियुक्त केलेले अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेशास मनाई राहील. उपकेंद्रावर १०० मीटरचे आत रस्त्यावरून वाहन नेण्यास मनाई राहील. परीक्षा उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी., आय.एस.डी., झेरॉक्स, फॅक्स, ई-मेल, ध्वनीक्षेपक इत्यादी सुविधांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. परीक्षा उपकेंद्रावर मोबाईल फोन, वायरलेस सेट, रेडीओ, दूरदर्शन, कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटर वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. परीक्षा उपकेंद्रावर एकाचवेळी चारपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर आदेश ४ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत लागू राहतील, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे