कृषि अवजार बँक स्थापन करण्यासाठी मिळणार अनुदान
· १५ नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
वाशिम, दि. ०२ (जिमाका) :
आकांक्षित जिल्हा असलेल्या वाशिम जिल्ह्यात सन २०२०-२१ मध्ये कृषि यांत्रिकीकरण
उपअभियान अंतर्गत कृषि कल्याण अभियान-३ अंतर्गत कृषि अवजारे बँक स्थापन करण्यास
शासनाने मान्यता दिली आहे. कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील
प्रत्येक तालुक्यातील दोन गावांमध्ये कृषि अवजार बँकेच्या माध्यमातून भाडे तत्वावर
कृषि यांत्रिकीकरण सेवा सुविधा उपलब्ध होणार आहे. कृषि अवजार बँकेसाठी ८० टक्के
किंवा जास्तीत जास्त ८ लाख अनुदान दिले जाणार आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक व पात्र
शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकऱ्यांचे स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक गट तसेच
कृषि विज्ञान केंद्र यांनी १५ नोव्हेंबर २०२० पर्यंत सर्व कागदपत्रांसह विहित
नमुन्यातील अर्ज संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
राज्यातील
चार आकांक्षित जिल्ह्यांमध्ये केंद्र शासनाद्वारे यापूर्वी कृषि कल्याण अभियान
भाग-१ व भाग-२ मध्ये निवडलेल्या गावांमध्येच कृषि अवजारे बँक सुविधेचा लाभ देय
राहणार आहे. या निवडक गावातून ट्रॅक्टरची संख्या कमी प्रमाणात असलेल्या गावे, अल्प
व अत्यल्प जमीनधारकांचे प्रमाण अधिक असलेली गावे व सध्या कृषि उत्पादकता वाढीस वाव
असलेली गावे या योजनेसाठी पात्र असतील.
विहित अर्जासोबत संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, खरेदी करावयाच्या यंत्र, अवजारे संचाचे दरपत्रक व परीक्षण पुरावा, आधारकार्ड सलंग्न बँक खात्याच्या पासबुकाच्या पहिल्या पृष्ठाची छायांकित प्रत, संस्थेशी संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यास संस्थेने प्राधिकृत केले असल्यास प्राधिकृत केल्याचे पत्र व संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड, फोटो असलेल्या ओळखपत्राची स्वयंसाक्षांकित परत सादर करणे आवश्यक आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर लक्षांकानुसार पात्र अर्जांमधून सोडत पद्धतीने उपविभागीय कृषि अधिकारी निवड करतील. तरी इच्छुक व पात्र शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकऱ्यांचे स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक गट तसेच कृषि विज्ञान केंद्र यांनी १५ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करावा, अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे श्री. तोटावार यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment