दिवाळी आनंदात पण साधेपणाने साजरी करा, आरोग्याची काळजी घ्या !

 


 

·        वाशिम जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

वाशिम, दि. १३ (जिमाका) : वर्षभरात साजऱ्या होणाऱ्या विविध सणापैकी दिवाळी हा एक महत्त्वाचा आणि आनंदाचा सण. हा सण साजरा करण्यासाठी बाहेरगावी असलेली मंडळी आपल्या गावी परत येऊन कुटुंबासोबत एकत्रितपणे हा सण साजरा करतात. यावर्षी मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग सुरुच आहे. कोरोना संसर्गाच्या काळात यंदाची दिवाळी प्रत्येकाने आनंदात पण साधेपणाने साजरी करतांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते आणि जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी जिल्हावासीयांना केले आहे.

 

यंदाच्या दिवाळीत खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत जातांना प्रत्येकाने दक्षता घ्यावी. सामाजिक अंतर ठेवावे. कोरोनाचा संसर्ग होणार नाही यासाठी प्रत्येकाने तोंडावर मास्क लावावे. कोणत्याही वस्तूला हात लावल्यानंतर हाताला सॅनीटायझर लावावे किंवा हात साबणाने स्वच्छ धुवावे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाने दक्ष राहून प्रत्यक्ष भेटीगाठी न घेता समाज माध्यमातून शुभेच्छा संदेश द्यावे. कुठेही गर्दी होणार नाही याबाबत प्रत्येकाने काळजी घ्यावी. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे प्रत्येकाने पालन करावे. ही दिवाळी घरगुती स्वरूपात मर्यादित राहील, याची पूर्ण दक्षता घ्यावी.

 

दिवाळी हा सण दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या उत्सवात दरवर्षी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. यावर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करतांना फटाके फोडणे टाळावे. फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम श्वसनावर होतो. त्यामुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करतांना दिव्यांची आरास करून हा उत्सव साजरा करावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

  1. Honorable Sir, please update daily, there will be convenience.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे