वाशिम जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



·         रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार
·         सौर कृषिपंप वापरावर भर देणार
·         ग्रामीण भागातील रस्ते सुधारणार
·         रुग्णालयासाठी निधी देणार

नागपूर, दि. १८ : राज्यातील आकांक्षीत जिल्ह्यांपैकी एक असलेल्या वाशिम जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांखाली निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर भौगोलिक रचनेमुळे जिल्ह्यात सिंचनासाठी मोठे प्रकल्प उभारणे शक्य नसले तरी लघुसिंचन प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

विधानभवन येथील मंत्री परिषद सभागृहात झालेल्या वाशिम जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार लखन मलिक, आमदार अमित झनक, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात सिंचनासाठी मोठे प्रकल्प नाहीत. त्यामुळे सिंचनाचा भार हा लघु प्रकल्पांवर आहे. अडाण नदीवर ३ बॅरेजस उभारण्याचा प्रस्ताव आहे. यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबत कार्यवाही करावी, तसेच जिल्ह्यातील लघु प्रकल्पांची कालवे दुरुस्ती झाल्यास पूर्ण क्षमतेने सिंचन होऊन सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होईल, ही बाब लोकप्रतिनिधींनी मांडल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील, तसेच जानोरी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता तातडीने देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.

जिल्हा परिषदे अंतर्गत अधिकाऱ्यांची ६० टक्के पदे रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. आकांक्षीत जिल्ह्यातील पदे रिक्त राहू नयेत, याबाबत सर्व जिल्ह्यांना लेखी सूचना करण्यात येईल, असे मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले. 

नोव्हेंबर २०१९ अखेरपर्यंत प्रलंबित असलेल्या वीज जोडण्यांपैकी आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे २५०० कृषिपंपांना वीज पुरवठा करण्यात आला आहे, उर्वरित सुमारे ४५०० कृषिपंपांना मार्च अखेरपर्यंत वीज पुरवठा करण्यात येणार आहे. वीज पुरवठा करताना ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असल्यास या ठिकाणी जास्त खर्च येत असल्याने याठिकाणी सौरकृषी पंप देण्यावर भर दिला जात आहे. सौरकृषी पंपांमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे.

राज्यातील ग्रामीण रस्त्यांचा प्रश्न सार्वत्रिक स्वरूपाचा आहे. ग्रामीण दळणवळणासाठी हे रस्ते उपयुक्त असल्याने या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरावरच निधीची उपलब्ध करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. तसेच जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर कामे मार्गी लावण्यात येतील, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील दूध संघ कार्यान्वित होण्यासाठी पावले उचलण्यात येतील. तसेच देशी गायींचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यामुळे दुधाचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यास मदत होईल. तसेच जिल्हा महिला रुग्णालय व कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या उर्वरित कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात येईल. वाशिम हा आकांक्षीत जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यातीळ विकास कामांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. जिल्ह्याच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी उपाययोजना आणि नाविन्यपूर्ण योजना याची प्रशासनाने दखल घेऊन जिल्ह्याला विकासाच्या मार्गाने न्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

यावेळी आमदार श्री. मलिक, आमदार श्री. पाटणी, आमदार श्री. झनक यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्न व समस्या यांचीच माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच हे प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली.

******

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश