बाळखेडमध्ये जलयुक्त शिवार अभियानामुळे पिकांना मिळाला आधार


  • बाळखेड येथील ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान
  • पत्रकार दौऱ्यामध्ये विविध कामांना भेटी

वाशिम 
: विद्यमान शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त बाळखेड (ता. रिसोड) येथे जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत झालेल्या कामांना भेटी देण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार बांधवांनी कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेली शेततळी व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्य ‘आपलं गाव, आपलं पाणी’ प्रकल्पाला भेट दिली. यावेळी बाळखेड येथील ग्रामस्थांनी जलयुक्त शिवार अभियानामुळे पिकांना आधार मिळाल्याचे सांगून या योजनेबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिक बलवंत गजभिये, तालुका कृषी अधिकारी आर. एच. तांबिले, जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहाय्यक तानाजी घोलप, कृषी पर्यवेक्षक श्री. इरतकर, कृषी सहाय्यक आशा वाघमारे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.

श्री. तांबिले यांनी कृषी विभागामार्फत बनविण्यात आलेल्या शेततळ्याविषयी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, शेततळ्याच्या खोदकामासाठी शासनामार्फत १०० टक्के अनुदान देण्यात येते. तर अस्तरीकरणासाठी लाभार्थ्यांना ५० टक्के हिस्सा भरावा लागतो. एका शेततळ्यामध्ये सुमारे २ टीएमसीपर्यंत पाणीसाठा होतो. ज्या ठिकाणी कठीण खडक आहे, त्याठिकाणी पाणी साठविण्यासाठी शेततळे हा उत्तम पर्याय आहे. यंदा खरीप हंगामात पावसाच्या खंड काळात शेतकऱ्यांना शेततळ्यांमुळे चांगला फायदा झाला आहे.

शेततळ्याचे लाभार्थी शेतकरी तुकाराम नारायण ढोले यांनी सांगितले की, यंदा शेततळ्यामुळे १० एकर क्षेत्रावरील सोयाबीनला दोन वेळा पाणी देणे शक्य झाले. त्यामुळे इतर शेतकऱ्यांना एकरी २ क्विंटलपर्यंत सोयाबीन उत्पन्न मिळाले असताना आपल्याला एकरी ७ क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळाले. तसेच आता रब्बी हंगामात ८ एकर क्षेत्रावर हरभरा पेरणी केली असून त्यासाठी पुरेसा पाणीसाठा शेततळ्यात असल्याचे ते म्हणाले.
‘आपलं गाव, आपलं पाणी’मुळे विहिरींची पाणीपातळी वाढली
बाळखेड व मोठेगाव येथे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात आलेल्या ‘आपलं गाव, आपलं पाणी’ प्रकल्पाला पत्रकारांनी भेट दिली. या प्रकल्पामुळे परिसरातील सुमारे ३० विहिरी व ११ विंधन विहिरींची पाणी पातळी वाढली असल्याचे बाळखेडा येथील शेतकऱ्यांनी सांगितले. मोठेगाव येथील ३५ ते ४० विहिरींची पाणीपातळी आजच्या दिवशीही १० फुटावर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मोठेगाव येथील शेतकरी बाबासाहेब देशमुख म्हणाले, आपलं गाव, आपलं पाणी प्रकल्पामुळे परिसरातील सुमारे ३० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाला पाणी मिळाले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना एकरी ८ ते १० क्विंटल उत्पन्न मिळाले आहे. विहिरीची पाणी पातळी चांगली असल्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा व हळद पिकालाही यावर्षी पुरेसे पाणी उपलब्ध होईल.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे