पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले लांडगे कुटुंबियांचे सांत्वन
वाशिम, दि. १३ : राज्याच्या गृह (शहरे), सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील आत्महत्या केलेल्या दत्ता लांडगे या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी लांडगे कुटुंबियांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच या कुटुंबियांना उत्पन्नाचा शाश्वत स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले.

यावेळी माजी आमदार विजय जाधव, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उपविभागीय अधिकारी संदीप सानप, तहसीलदार सोनाली मेटकरी आदी उपस्थित होते. यावेळी दत्ता लांडगे यांचे वडील आत्माराम लांडगे, आई सत्यभामा व पत्नी सोनाली यांनी पालकमंत्री डॉ. पाटील यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच दत्ता लांडगे यांच्या पत्राची शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी केली.
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. पाटील म्हणाले की, दत्ता लांडगे या युवा शेतकऱ्याची आत्महत्या दुर्दैवी घटना आहे. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येवू नये, यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता थोडा धीर धरावा, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. दत्ता लांडगे यांनी लिहिलेले पत्र व लांडगे कुटुंबियांच्या भावना आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचवणार असल्याचे पालकमंत्री डॉ. पाटील यांनी सांगितले.

****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश