तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार- जिल्हाधिकारी द्विवेदी
तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार- जिल्हाधिकारी द्विवेदी
·
अफवांना बळी न
पडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
·
जिल्ह्यातील २४
केंद्रांवर होणार परीक्षा
·
परीक्षा केंद्र
परिसरात कलम १४४ लागू
वाशिम, दि. १० : जिल्हाधिकारी व अधिनस्त
क्षेत्रीय आस्थापनेवरील तलाठी संवर्गाची लेखी परीक्षा दिनांक १३ सप्टेंबर २०१५
रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध २४ केंद्रांवर होत आहे.
परीक्षा प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे होणार आहे. नोकरीस लावून देतो असे सांगून
फसवणूक करणाऱ्यांपासून तसेच तोतयागिरीपासून परीक्षार्थींनी सावध रहावे. याबाबत
कोणत्याही व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करू नयेत, फसवणूक झाल्यास जिल्हा निवड समिती
जबाबदार राहणार नाही, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कळविले आहे.
वाशिम येथील जवाहर नवोदय
विद्यालय, राजस्थान आर्य कॉलेज, श्री. शिवाजी हायस्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या
शाळा, बाकलीवाल विद्यालय, श्रीमती मुलीबाई चरखा इंग्लिश स्कूल, हॅपी फेसेस इंग्लिश
स्कूल, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, शासकीय तंत्र निकेतन, रेखाताई कन्या
शाळा, मालतीबाई सरनाईक कन्या शाळा, न.प. महात्मा गांधी विद्यालय, श्रीमती राधादेवी
बाकलीवाल विद्यालय, लॉयन्स विद्या निकेतन, मौलाना आझाद उर्दू हायस्कूल व सरस्वती
समाजकार्य महाविद्यालय या १६ परीक्षा केंद्रांवर, रिसोड येथील बाबासाहेब धाबेकर
महाविद्यालय, भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, भारत माध्यमिक कन्या शाळा, श्री
शिवाजी हायस्कूल, सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय व महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय
या ६ परीक्षा केंद्रांवर आणि मंगरूळपीर येथील जिल्हा परिषद हायस्कूल व यशवंतराव
चव्हाण महाविद्यालय या २ परीक्षा केंद्रांवर तलाठी पदाची लेखी परीक्षा घेतली जाणार
आहे.
परीक्षा केंद्र
परिसरात कलम १४४ लागू राहणार
दिनांक १३ सप्टेंबर २०१५ रोजी
सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्व परीक्षा केंद्रांवर फौजदारी दंड प्रक्रिया
संहिता १९७३ चे कलम १४४ लागू राहणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्र परिसरात
एकाचवेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही. परीक्षार्थी अथवा
अन्य व्यक्तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करता येणार नाही. तसेच
परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील इंटरनेट, झेरॉक्स सेंटर, पानपट्टी सेंटर,
टायपिंग सेंटर, एसटीडी बूथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे परीक्षा कालावधीत बंद
राहतील. परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल, सेल्युलर फोन, लॅपटॉप, फॅक्स व इतर
प्रसारमाध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई आहे. परीक्षा केंद्रांवर कोणत्याही
अनधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेश दिला जाणार नाही, असे जिल्हाधिकारी
कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
लेखी परीक्षेची
प्रवेशपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध
लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या
उमेदवारांची यादी व लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.washim.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून
देण्यात आली आहे. उमेदवारांनी परीक्षेसाठी येताना प्रवेश पत्रासोबतच स्वतःचे आधार
कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट किंवा वाहन चालवण्याचा परवाना (फक्त स्मार्ट कार्ड
प्रकारचा) यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. अन्यथा उमेदवारास
परीक्षेस बसू दिले जाणार नाही. उमेदवारांना काही अडचणी असल्यास त्यांनी
०७२५२-२३३६५३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत
कळविण्यात आले आहे.
****
Comments
Post a Comment