महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड
·
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आयोजित जिल्हास्तरीय
प्रदर्शनीचे उद्घाटन
·
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत
आयोजन
·
स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे
प्रदर्शन व विक्री
·
विविध उत्पादनांचे ७० स्टॉल;विविध
वस्तू एकाच छताखाली खरेदीची संधी
वाशिम, दि. ३० : जिल्ह्यात महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून
उत्पादित केल्या जाणाऱ्या वस्तू तसेच शेतकरी गटांच्या उत्पादनांना जिल्हास्तरावर हक्काची
बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाच्यावतीने वाशिम येथे या वस्तूंचा मॉल उभारण्यात
येणार आहे. याकरिता ५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन महसूल
राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज केले.
जुनी जिल्हा परिषद परिसरात जिल्हा ग्रामीण विकास
यंत्रणेच्यावतीने आयोजित ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित
केलेल्या वस्तूंच्या जिल्हास्तरीय प्रदर्शनीचे उद्घाटन करताना ते बोलत होते. महाराष्ट्र
राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख होत्या.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील,
वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या सभापती
पानुताई जाधव, अतिरिक्त मुख कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा ग्रामीण विकास
यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन माने आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. राठोड
यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सर्व मान्यवरांनी प्रदर्शनीत उभारण्यात आलेल्या स्टॉलला
भेट दिली.
पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, ग्रामीण भागातील महिला
बचत गट, शेतकरी गटांची उत्पादने, वस्तूंना जिल्हास्तरावर कायमस्वरूपी बाजारपेठ
मिळवून देण्याच्या दृष्टीने या उत्पादने, वस्तूंच्या विक्रीसाठी वाशिम येथे मॉलची
उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यादृष्टीने इतर आवश्यक कार्यवाही
तातडीने करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या
ठिकाणी होणाऱ्या या मॉलमुळे ग्रामीण भागातील महिला बचत गट व शेतकरी गटांची
उत्पादने एकाच छताखाली खरेदीची संधी ग्राहकांना मिळेल. या माध्यमातून बचत गट,
शेतकरी गटाच्या अर्थकारणाला गती मिळेल व महिला बचत गटांच्या गटांच्या चळवळीला चालना
मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
महिला बचत गटांना अधिकाधिक मदत करून त्यांच्या उद्योग,
व्यवसायात सहाय्य करण्यासाठी राज्य शासन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती
अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. बचत गटांनी पारंपारिक वस्तू, उत्पादनांसोबत
नवीन क्षेत्रातील संधींचा सुध्दा शोध घेऊन त्यानुसार व्यवसाय सुरु केला पाहिजे. या
व्यवसायासाठी आवश्यक कौशल्य मिळविण्यासाठी त्यांना केंद्र शासनाच्या कौशल्य विकास
कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण घेता येईल. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने आयोजित
केलेली तीन दिवशीय प्रदर्शनी महिला बचत गटांची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी
उपयुक्त आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनीला भेट देऊन महिला बचत गटांनी
उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहनही पालकमंत्री श्री. राठोड
यांनी यावेळी केले.
बचत गटांना कर्जपुरवठा होण्यासाठी
बँकांकडे पाठपुरावा करा
ग्रामीण भागातील महिला
बचत गटांना उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांना कर्ज उपलब्ध करून देणे, ही
बँकेची जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येक बँकनिहाय कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले
जाते. याप्रमाणे कर्ज वाटप करण्यास बँकांकडून टाळाटाळ होत असल्यास जिल्हा अग्रणी
बँक व्यवस्थापक यांनी संबंधित बँकांना सक्त सूचना द्याव्यात. या अनुषंगाने जिल्हा
प्रशासनाच्या माध्यमातून सुध्दा पाठपुरावा करण्याच्या सूचना पालकमंत्री संजय राठोड
यांनी दिल्या.
बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या
विकासाला हातभार : जि. प. अध्यक्ष हर्षदा देशमुख
ग्रामीण भागात महिला बचत गटांच्या माध्यमातून उभा राहत
असलेल्या व्यवसायांमुळे महिलांना आधार मिळाला आहे. या माध्यमातून उत्पादित होत
असलेल्या वस्तूंच्या विक्रीमुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होत आहेत. महिला
बचत गटांना बँकांनी आवश्यकतेनुसार अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच
जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उद्योग, व्यवसाय सुरु
करून आपली आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष
हर्षदा देशमुख यांनी केले.
महिलांच्या सक्षमीकरणास बचत गटांमुळे
मदत : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी
ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक विकास साधण्यासाठी महिला
बचत गट हे महत्त्वाचे माध्यम आहे. या गटांशी जोडल्या गेलेल्या महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यामतून शासनाचे प्रयत्न सुरु
आहेत. आर्थिक नियोजनाचा उपजत गुण महिलांमध्ये असतो. त्याचा उपयोग बचत गटांद्वारे
सुरु असलेल्या उद्योग, व्यवसायामध्ये होत आहे. ग्रामीण भागात महिला बचत गटांच्या
माध्यमातून सुरु असलेल्या उद्योग, व्यवसायांमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास
मदत झाल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.
‘अस्मिता’ योजनेत महिला बचत गटांनी
सहभागी व्हावे : मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना
राज्य शासनाच्या ग्रामीण विकास विभागाने ग्रामीण भागातील
महिला व जिल्हा परिषद शाळेतील किशोरवयीन मुलींना सवलतीच्या दरात सॅनिटरी नॅपकिन
उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना सुरु केली आहे. या योजनेत ग्रामीण भागातील महिला
बचत गटांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक
कुमार मीना यांनी केले. तसेच बचत गटांनी आपले उद्योग, व्यवसायाचा विस्तार करून
जास्तीत जास्त महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असे त्यांनी
यावेळी सांगितले.
बचत गटाच्या माध्यमातून शेतीला
जोडधंदा सुरु करा : जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील
जिल्ह्यातील अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. बदलत्या
हवामानामुळे शेती बेभरवशाची बनली असून शेतीला जोडधंदा म्हणून बचत गटाच्या
माध्यमातून महिलांनी उद्योग, व्यवसाय सुरु केल्यास कुटुंबाला आर्थिक उत्पन्नाचा नवा
स्त्रोत मिळतो. तसेच बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना मोठ्या शहरांमध्ये
चागंली मागणी आहे. महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून उद्योग उभारून आपला विकास
साधण्याचा प्रयत्न करावा, असे जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी यावेळी सांगितले.
महिला बचत गटाच्या वस्तू, उत्पादनांचे
७० स्टॉल
ग्रामीण भागातील विविध बचत गटांनी उत्पादित केलेल्या
वस्तू, उत्पादांचे ७० स्टॉल प्रदर्शनीत लावण्यात आले आहेत. यामध्ये पारंपारिक
वस्तू, विणकाम केलेल्या वस्तू , मसाले, पापड, लोणचे यासह इतर विविध उत्पादने व
खाद्यपदार्थांच्या स्टॉलचा समावेश आहे. दि. ३१ मार्च २०१८ पर्यंत ही प्रदर्शनी
सुरु राहणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शानीला भेट
देऊन वस्तू व उत्पादनांची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास
यंत्रणेच्यावतीने करण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment