‘मुद्रा’ योजनेमुळे बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी - विजय खंडरे
· मालेगाव येथे प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा
वाशिम, दि. २२ : प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून बेरोजगार युवकांना सहज व कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही लहान-मोठे उद्योग, व्यवसाय सुरु होऊन बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडरे यांनी सांगितले. मालेगाव येथील जुने बसस्थानक परिसरात जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन व जिल्हा अग्रणी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, तहसीलदार रवी राठोड, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक चंद्रशेखर धारगावे, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप आदी उपस्थित होते. या मेळाव्याला तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
श्री. खंडरे म्हणाले की, मुद्रा योजनेतून कर्ज मिळविण्यासाठी युवकांनी प्रथम आपला व्यवसाय निश्चित करावा. त्यानुसार आवश्यक यंत्र सामग्री अथवा कच्चा मालाचे कोटेशन, व्यवसायाचा पत्ता यासह इतर कागदपत्रे जोडून आपला अर्ज बँकेकडे सादर करावा. त्यानंतर सदर बँकेचे शाखा व्यवस्थापक तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करतील व त्यानुसार कर्ज मंजूर करण्यात येईल. कोणताही व्यवसाय सुरु करताना त्यातून निघणाऱ्या उत्पादनाला समाजातून किती मागणी आहे, याविषयी प्रथम अभ्यास करा. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून मिळालेले कर्ज ज्या व्यवसायासाठी घेतले आहे, त्यामध्येच गुंतवा. जेणेकरून सदर व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कर्जाची परतफेड करणे शक्य होईल. बँकेमध्ये असलेला पैसा हा आपल्या सर्वांचा आहे. त्यामुळे बँकेकडून घेतलेले कर्ज फेडणे, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. नगराळे यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज प्रकाराबाबत मार्गदर्शन केले. तसेच कोण-कोणत्या व्यवसायासाठी मुद्रा योजनेतून कर्ज मिळू शकते, याविषयी माहिती दिली. या योजनेतून आवश्यकतेनुसार कर्जाचा लाभ घेऊन आदर्शवत व्यवसाय, उद्योग सुरु करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी मालेगावचे तहसीलदार श्री. राठोड यांनी प्रास्ताविकामध्ये प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्याच्या आयोजनाचा हेतू विषद केला. मालेगाव तालुक्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवकांपर्यंत प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती पोहोचावी व त्याद्वारे तालुक्यात नवीन उद्योग, व्यवसाय सुरु होण्यास मदत व्हावी, हा या मेळाव्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी श्री. वैद्य, श्री. धारगावे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी सुनील लोखंडे यांनी केले.
कारंजा येथे आज प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा
प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी प्रत्येक तालुक्यात प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावे आयोजित करण्यात येत असून गुरुवार, दि. २३ मार्च २०१७ रोजी कारंजा तहसीलदार कार्यालय परिसरात हा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी सुशिक्षित बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच उद्योग, व्यवसाय सुरु करण्यास इच्छुकांची नोंदणी याठिकाणी केली जाणार आहे. तरी कारंजा तालुक्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार युवकांनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समिती, जिल्हा प्रशासन, जिल्हा अग्रणी बँक व कारंजा तहसीलदार कार्यलय यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment