बेरोजगार युवकांना स्वावलंबी बनण्यासाठी मुद्रा योजना उपयुक्त - उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक




·        मंगरूळपीर येथे प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळावा
·        बँकिंग क्षेत्रातील विविध तज्ज्ञांकडून उपस्थितांना मार्गदर्शन
वाशिमदि२४ :  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेली मुद्रा योजना बेरोजगार युवकांना स्वावलंबी बनण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मंगरूळपीर तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपला स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरु करावा, असे प्रतिपादन मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांनी केले. जिल्हास्तरीय मुद्रा समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा अग्रणी बँक व मंगरूळपीर तहसील कार्यालयाच्यावतीने आयोजित प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्यामध्ये ते बोलत होते.
यावेळी तहसीलदार के. बी. सुरडकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक अनिल गोतमारे, सागर भुतडा, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक एच. झेड. कोचर, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक एम. एस. जोग, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी श्री. पारनाईक म्हणाले की, कोणत्याही प्रकारचे मोर्गेज न घेता प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून दहा लक्ष रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे बेरोजगार युवकांना लहान-लहान उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत होईल. या युवकांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन निर्माण होणार आहे. तसेच सध्या अस्तित्वात असलेला व्यवसाय किंवा उद्योग वाढविण्यासाठी सुधा मुद्रा योजना उपयुक्त असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त युवकांनी घेऊन आपली प्रगती साधावी.
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक श्री. गोतमारे म्हणाले की, प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून लहान उद्योग, व्यवसायांसाठी सहज कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे मोर्गेज अथवा हमी देण्याची आवश्यकता नाही. भाजीपाला विक्रेत्यांपासून ते मिठाई दुकानांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी या योजनेतून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेतून कर्ज मिळवण्यासाठी इच्छुक युवकांनी सर्वप्रथम आपल्या व्यवसायाची निवड करावी. तसेच तो व्यवसाय सुरु करण्यासाठी किती कर्ज आवश्यक आहे, त्या कर्जातून कोणत्या बाबीवर किती खर्च होणार आहे, आदी तपशील असलेला प्रस्ताव बँकेकडे द्यावा. या प्रस्तावानुसार बँकेचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून या कर्ज प्रकरणावर निर्णय घेतील.
तहसीलदार श्री. सुरडकर म्हणाले की, होतकरू, बेरोजगार युवकांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेविषयी सर्वांना सविस्तर माहिती मिळावी याकरिता प्रधानमंत्री मुद्रा कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामाध्यमातून युवकांनी मुद्रा योजनेविषयी माहिती घ्यावी व त्यानुसार आपले कर्ज प्रस्ताव तयार करून संबंधित बँकेमध्ये सादर करावेत. बँकांनीही या युवकांना सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांना उद्योग, व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे.
सर्वप्रथम प्रास्ताविकामध्ये जिल्हा अग्रणी बँकेचे श्री. नगराळे म्हणाले की, उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी इच्छुक असलेल्या युवकांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ज्या उद्योग, व्यवसायासाठी हे कर्ज घेतले आहे, त्याच उद्योगामध्ये या कर्जाची गुंतवणूक करून त्यातून आपली प्रगती साधावी. या योजनेतून मिळालेल्या कर्जाची वेळेत परतफेड करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक श्री. भुतडा, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक श्री. कोचर, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक श्री. जोग यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन तलाठी दिलीप चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन निवासी नायब तहसीलदार एस. आर. जाधव यांनी केले. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे स्टॉल लावण्यात आले होते.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे