राष्ट्रीय लोकअदालतीमुळे वादाला पूर्णविराम - न्यायमूर्ती भूषण गवई




·       वाशिम जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालात
·       विविध २३० तंटे सामोपचाराने सोडविले
वाशिम, दि. ११ : न्यायालयात दाखल झालेली तसेच दाखल पूर्व प्रकरणे सामोपचाराने सोडवून वादावर जलदगतीने तोडगा काढण्याची संधी राष्ट्रीय लोकअदालतीमुळे मिळते. याद्वारे वादाला पूर्ण विराम मिळत असल्याने पक्षकारांच्या वेळेत व पैशात बचत होते, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शाम दरणे होते.
 याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. श्रीराम काळू, वाशिम जिल्हा विधिज्ञ संघाचे उपाध्यक्ष अॅड. गणेश अवस्थी यांची प्रमुख उपस्थिती होती.
न्यायमूर्ती गवई म्हणाले की, न्यायालयामध्ये दाखल होत असलेल्या प्रकरणांचे प्रमाण वाढत असल्याने ही प्रकरणे निकाली निघण्यास वेळ लागतो. तसेच कनिष्ठ न्यायालयाने निकाल दिल्यावरही ज्या पक्षकाराच्या विरोधात हा निकाल जातो, तो वरिष्ठ न्यायालयात अपील करतो. त्यामुळे अनेक वाद व तंटे वर्षोनुवर्षे सुरूच राहतात. यामध्ये पक्षकारांचा वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून सामोपचाराने हे तंटे सोडविले गेल्यास पक्षकारांच्या वेळेत व पैशात बचत होते. तसेच परस्परांमधील वादाला पूर्णविराम मिळून सुसंवाद सुरु होण्यास मदत होते. त्यामुळे पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सहभागी होऊन आपले तंटे सामोपचाराने सोडविण्याचा प्रयत्न करावा.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्री. दरणे यांनी यावेळी राष्ट्रीय लोकअदालतीचे महत्त्व विषद केले. तसेच जिल्ह्यात वेळोवेळी आयोजित करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पक्षकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा वाशिम तालुका विधी सेवा समितीच्या सचिव श्रीमती एस. एन. शाह यांनी केले. आभार प्रथम जिल्हा न्यायाधीश के. के. गौर यांनी मानले.
राष्ट्रीय लोकअदालतीमधील तंटे सोडविण्यासाठी तिसरे जिल्हा न्यायाधीश एस. बी. पराते, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. ए. खान, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर. के. गुज्जर, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती एम. व्ही. भराडे, दुसरे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर कविता गिते, चौथे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एम. एस. पौळ यांच्या ६ पॅनेलसमोर सुनावणी घेण्यात आल्या. राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी दुसरे जिल्हा न्यायाधीश ए. के. शाह, मुख्य न्याय दंडाधिकारी एस. पी. देशमुख, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस. पी. वानखडे, पाचवे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्री. बुंदे आदींनी विशेष सहकार्य केले.
२३० प्रकरणांवर सामोपचाराने तोडगा
            राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या एकूण १७०२ प्रकरणापैकी २३० प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यात आला. यामध्ये ११० दाखलपूर्व प्रकरणे व १२० दाखल, प्रलंबित प्रकरणांचा समावेश आहे. निपटारा झालेल्या दाखलपूर्व प्रकरणांमध्ये बँकांशी संबंधित प्रकरणात ५ लक्ष ७५ हजार १०० रुपये वसुल करण्यात आले. तडजोडीपात्र फौजदारी गुन्हे, धनादेश न वाटल्याने दाखल झालेली प्रकरणे, मोटार वाहन अपघात प्रकरणे, भूसंपादन व इतर एकूण १२० दाखल प्रकरणे लोकअदालतीमध्ये निकाली निघाली, यामध्ये ५८ लक्ष ७१८ रुपये वसूल करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे