अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीसाठी वाशिम जिल्हा प्रशासन सज्ज




·        सर्व २९ मतदान केंद्रांवरील तयारी पूर्ण
·        १८ हजार ७३६ मतदार बजावणार हक्क
·        जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतला आढावा
वाशिम, दि. ०२ :  अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीसाठी दि. ३ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वा. पर्यंत मतदान होत असून याकरिता वाशिम जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. वाशिम जिल्ह्यात एकूण १८ हजार ७३६ पदवीधर मतदार असून २९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया चालणार आहे. याकरिता नियुक्त अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला.
याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, वाशिमच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार बळवंत अरखराव, रमेश जसवंत, शेख यांच्यासह सर्व मतदान केद्राध्यक्ष, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक मतदान केंद्रावर केन्द्राध्यक्षसह मतदार संख्येनुसार ४ ते ५ मतदान अधिकारी, कर्मचारी व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले, पदवीधर निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततामय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. मा. भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेल्या सर्व सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करून कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेत व्यत्यय येणार नाही याची दक्षता घ्यावी.
ओळखपत्र म्हणून १४ दस्ताऐवज ग्राह्य
मतदान ओळखपत्राबरोबरच पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, पॅनकार्ड, पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र, शासकीय किंवा निमशासकीय स्थानिक प्राधिकरण यांचे ओळखपत्र, बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्याचे फोटो असलेले पासबुक, स्थावर मालमत्ता यांचे नोंदणीकृत फोटो असलेले दस्ताऐवज, फोटो असलेले रेशनकार्ड, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र ज्यावर फोटो आहे, फोटो असलेले शस्त्राचे ओळखपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याद्वारे देण्यात आलेले शारीरिक अपंगत्वाचे फोटोसह प्रमाणपत्र, आधार कार्ड किंवा एनपीआर अधिनस्त आरजीआय यांनी प्रदान केलेले स्मार्ट कार्ड याचा वापर मतदान केंद्रावर प्रवेशासाठी करता येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी यावेळी सांगितले.
पदवीधर मतदारांच्या मदतीसाठी ‘सर्चइंजिन’ व बीएलओ
वाशिम जिल्ह्यातील पदवीधर मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधण्यास अडचण येऊ नये, याकरिता उमेदवाराचे नाव, अनुक्रमांक, पत्ता व मतदान केंद्राची माहिती www.washim.amtgraduate.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर जाऊन स्वतःचे आडनाव व नाव टाईप केल्यानंतर पात्र पदवीधर मतदारांना त्यांचा अनुक्रमांक, नाव, पत्ता व मतदान केंद्राची माहिती मिळेल. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर लॅपटॉपच्या सहाय्यानेही मतदाराचे नाव व मतदान केंद्राविषयी माहिती शोधून देण्यात येणार आहे.
फलकाद्वारे दिली जाणार मत नोंदणीविषयी माहिती
मतदान करत असताना आपले मत कसे नोंवावे, याबाबत मतदारांना माहिती मिळण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर डिजिटल फलक लावण्यात येणार आहे. यामध्ये पसंतीक्रमांक, मत नोंदविण्याची पध्दत याविषयी माहिती दिली जाणार असल्याने मतदारांना मत नोंदविताना अडचण निर्माण होणार नाही.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे