माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी
·
जिल्हास्तरीय माजी
सैनिक, विधवा मेळावा
·
ध्वजदिन निधी
संकलनबद्दल सीईओ पाटील यांचा सत्कार
वाशिम, दि. ३० : देशाची
सेवा करून परत आलेल्या माजी सैनिकांना सर्वसामान्य नागरी जीवनात येणाऱ्या समस्या
सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी
यांनी आज नियोजित सैनिक संकुलाच्या जागेवर आयोजित जिल्हास्तरीय माजी सैनिक, विधवा
यांच्या मेळाव्यात सांगितले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कर्नल
आर. आर. जाधव, सैन्यामध्ये कर्नल पदापर्यंत पोहचून निवृत्त झालेले वाशिम
जिल्ह्यातील निवृत्त कर्नल प्रवीण ठाकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्वप्रथम
दीपप्रज्ज्वलन व शहीद स्मारक स्मृती चिन्हाला पुष्पहार अर्पण करून मेळाव्याला
सुरुवात झाली. ध्वजदिन निधी संकलनात जिल्हा परिषदेने १२५ टक्के उद्दिष्ट्य पूर्ण
केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांचा यावेळी शहीद स्मृतिचिन्ह
देवून सत्कार करण्यात आला. तसेच शहीद सैनिक विधवा व विशेष प्राविण्य मिळविलेल्या
माजी सैनिक पाल्यांचाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यातील माजी
सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी यापुढे प्रत्येक जिल्हास्तरीय लोकशाही दिनाच्या
दिवशी सर्व संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या
बैठकीमध्ये जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या माजी सानिकांच्या
समस्यांबाबत आपण स्वतः पाठपुरावा करून त्या समस्या तातडीने सोडविण्याला प्राधान्य
देणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. देशातील जनता सैनिकांवर सर्वाधिक
विश्वास ठेवते. सैन्यानेही गेली कित्येक वर्ष जनतेचा हा विश्वास सार्थ ठरविला आहे.
त्यामुळे समाज ध्वजदिन निधीच्या माध्यमातून सैन्याला पाठबळ देत असल्याचे त्यांनी
सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी गणेश पाटील म्हणाले की, ध्वजदिन निधीच्या माध्यमातून सर्वसामन्य
नागरिकांना सैनिक, माजी सैनिकांसाठी राबविल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांमध्ये
सहभाग नोंदविण्याची संधी मिळते. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, अधिकारी व
कर्मचारी या निधी संकलनाचे उद्दिष्ट्य पूर्ण करून आपली जबाबदारी चांगल्या पध्दतीने
बजावत आहेत. १५ ते २० वर्ष अखंडपणे देशाची सेवा करून आलेल्या माजी सैनिकांना
सामान्य नागरिकाचे जीवन जगताना कोणतीही समस्या उद्भवल्यास त्यांचा तातडीने निपटारा
करण्याच्या सूचना जिल्हा परिषद व सर्व अधिनस्त कर्मचाऱ्यांना दिल्याचे त्यांनी
यावेळी सांगितले.
प्रास्ताविकामध्ये जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कर्नल आर. आर. जाधव म्हणाले की, माजी सैनिकांसाठी कल्याणकारी
योजना राबविण्यासाठी वाशिम जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे स्वतःची जागा उपलब्ध
नव्हती. मात्र आता पोलीस कवायत मैदानाच्या बाजूची जागा जिल्हा सैनिक कल्याण
कार्यालयाला देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतल्याने सैनिक संकुल
व जिल्हास्तरीय शहीद स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याठिकाणी माजी
सैनिक, विधवा व त्यांचे पाल्य यांच्याकरिता विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार
असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याने सलग पाचव्या वर्षी उद्दिष्टापेक्षा अधिक
ध्वजदिन निधीचे संकलन करण्याची परंपरा कायम ठेवली असल्याचेही श्री. जाधव यांनी
सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व
आभार प्रदर्शन संजय देशपांडे यांनी केले. जिल्हा सैनिक संकुलासाठी जागा उपलब्ध
करून दिल्याबद्दल आसेगाव येथील महिला बचत गट व माजी सैनिक संघटना, मालेगाव तालुका
माजी सैनिक संघटना व वाशिम तालुका माजी सैनिक संघटना यांच्यावतीने जिल्हाधिकारी
राहुल द्विवेदी यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment