‘डिजिटल पेमेंट’च्या पर्यायाचा अवलंब करण्याची गरज

·        रोखरहित व्यवहाराचे अनेक मार्ग उपलब्ध
·       ‘मोबाईल बँकिंग’साठी स्मार्टफोनची गरज नाही
·       विविध कार्ड्स, स्मार्टफोनच्या सहाय्याने व्यवहार शक्य
देशातील काळा पैसा व भ्रष्टाचाराचे निर्मुलन करण्यासाठी सर्वांनी ऑनलाईन किंवा मोबाईल बँकिंगद्वारे व्यवहार करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना नुकतेच केले आहे. काळा पैसा व भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी ‘डिजिटल पेमेंट’ ही संकल्पना फायदेशीर ठरणारी आहे. तसेच ‘डिजिटल पेमेंट’चे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने व ही संकल्पना अतिशय सोपी असल्याने सर्वसामन्य नागरिकांनाही याचा वापर करणे सहज शक्य होणार आहे. बँकांमार्फत देण्यात येणारे विविध कार्ड, मोबाईल बँकिंग, एईपीएस, मिक्रो एटीएम, युपीआय, वॉलेटस, पीओएस प्रणालीद्वारे रोखरहित व्यवहार करून ‘डिजिटल पेमेंट’चा पर्याय सर्वांना वापरता येणे शक्य आहे. या सर्व पर्यायांचा वापर कसा करता येईल, याची माहिती पुढील प्रमाणे आहे.
बँक कार्ड्स-

बँकेमार्फत ग्राहकांना प्रीपेड कार्ड, डेबिट कार्ड व क्रेडीट कार्ड अशी तीन प्रकारची कार्ड दिली जातात. या बँक कार्ड्सच्या माध्यमातून व्यवहार करणे अगदी सोपे आहे. आपण कार्ड स्वाइप केल्यावर आपला पिन क्रमांक टाकल्यानंतर आपल्या बँक खात्यातील पैसे थेट विक्रेत्याच्या खात्यात जमा होतात. क्रेडिट कार्डच्या बाबतीतही असेच असून यामध्ये ठरावीक मुदतीच्या आत आपल्याला पैशांचा परतावा करावा लागातो. सध्या प्रीपेड कार्ड्स या नवीन पद्धतीचा वापर होत आहे. या प्रीपेड कार्डमध्ये ठराविक रक्कम भरून ही रक्कम संपेपर्यंत आपण त्या कार्डचा वापर करू शकतो. याचबरोबर रक्कम संपल्यावर पुन्हा मोबाइलप्रमाणे रीचार्जही करण्याचीही सुविधा या कार्डमध्ये असते. बँकेमध्ये खाते असल्यास आपल्याला डेबिट कार्ड मिळते. त्याआधारे एटीएम, वॉलेटस, मायकोएटीएम, ऑनलाईन शॉपिंगचे व्यवहार करता येतात. प्रीपेड, डेबिट अथवा क्रेडीट कार्ड मिळविण्यासाठी तसेच ती कार्यान्वित करण्यासाठी बँकेमध्ये सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली जाते.
मोबाईल बँकिंग -

बँक खात्याशी सलग्न असलेल्या मोबाईल नंबरवरून युएसएसडी प्रणालीच्या आधारे मोबाईल बँकिंगद्वारे व्यवहार करण्याचा सोपा पर्याय बँक ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. मोबाईल बँकिंगसाठी स्मार्टफोनची आवश्यकता नाही. साध्या मोबाईल फोनद्वारेही मोबाईल बँकिंग शक्य आहे. बँक खात्याशी मोबाईल क्रमांक सलग्न केल्यानंतर त्या क्रमांकावरून *९९# डायल करावे. त्यानंतर बँकेच्या नावाची पहिली तीन अद्याक्षरे किंवा आयएफएससी (IFSC) कोडची पहिली चार अक्षरे टाईप करा. यानंतर फंड ट्रान्स्फर एमएमआयडी (MMID) हा पर्याय निवडल्यानंतर ज्याला पैसे द्यायचे आहेत त्याचा मोबाईल नंबर आणि एमएमआयडी नंबर टाईप करा. त्याला द्यायची रक्कम व तुमचा मोबाईल पिन अर्थात एमपीआयएन (MPIN) टाईप केल्यानंतर स्पेस द्या व अकाऊंट नंबरचे शेवटची चार अंक टाईप करा. असे करताच तुमचे पैसे संबंधित व्यक्तीला पाठवून दिले जातील.
 आधार समर्थ प्रदान यंत्रणा (एईपीएस) -

आधार समर्थ प्रदान यंत्रणा अर्थात ‘एईपीएस’ (AEPS) द्वारे व्यवहार करण्यासाठी आपला आधार क्रमांक बँक खात्याशी सलग्न करणे आवश्यक आहे. एईपीएसमुळे पीओएस (मायक्रोएटीएम) च्या सहाय्याने पैसे पाठविणे, खात्यामध्ये पैसे जमा करणे, पैसे काढणे व खात्यामधील शिल्लक तपासणे आदी व्यवहार करणे शक्य आहे.
युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) -

स्मार्टफोनचा वापर करून बँक खात्यात पैसे पाठविण्याचे यूपीआय (UPI) हे सर्वात सोपे माध्यम आहे. ही सुविधा वापरण्यासाठी बँकेत खाते असणे आणि मोबाइल क्रमांक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. हे अ‍ॅप वापरण्यासाठी बँकेच्या ग्राहकाला आपल्या स्मार्टफोनमध्ये यूपीआयधारित अ‍ॅप डाऊनलोड करावे लागते. या अ‍ॅपमधून व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक आयडी तयार करून पिन नंबर तयार करू शकता. त्यानंतर अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही व्यवहार करू शकता.
ई-वॉलेटस-

रोखविरीहीत व्यवहारासाठी ई-वॉलेटसचा वापर करण्यासाठी स्मार्टफोनवर बँकेचे अथवा खाजगी कंपनीचे ई-वॉलेट अॅप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. हे अॅप मोबाईल नंबरशी सलग्न केल्यानंतर ते डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड किंवा नेट बँकिंगशी जोडणे आवश्यक असते.
पोइंट ऑफ सेल (पीओएस) –


पोइंट ऑफ सेल अर्थात पीओएस (PoS) प्रणालीद्वारे रोखविरहित व्यवहार करण्याची पध्दत आज दुकान, मॉल, पेट्रोलपंप आदी अनेक ठिकाणी पहावयास मिळते. प्रीपेड कार्ड, डेबिट कार्ड अथवा क्रेडीट कार्डच्या सहाय्याने पीओएसद्वारे रक्कमेची आदानप्रदान करता येते. तसेच मोबाईल फोनशी सलग्न एमपीओएस (MPoS) प्रणालीद्वारे व व्हर्चुअल ई-पेमेंट गेटवे ((V-PoS)) द्वारेही रोखरहित व्यवहार करता येतात.


संकलित फोटो.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे