‘चला, एक तरी झाड लावू, वसुंधरा वाचवू’
·
वृक्षदिंडीद्वारे
वृक्षारोपण करण्याचा संदेश
·
विद्यार्थ्यांनी सांगितले
वृक्षारोपणाचे महत्त्व
·
वृक्ष लागवड मोहिमेत
सहभागी होण्याचे आवाहन
वाशिम, दि. २९ : दिनांक १ जुलै २०१६ रोजी राज्यात
राबविण्यात येत असलेल्या २ कोटी वृक्ष लागवड मोहिमेमध्ये सहभागी होण्याकरिता
जनजगृती करण्यासाठी आज जिल्हा प्रशासन, सामाजिक वनीकरण विभाग व शिक्षण
विभागाच्यावतीने वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ‘चला, एक तरी झाड लावू, वसुंधरा
वाचवू’ असा संदेश देत वृक्षरोपणाविषयी जनजागृती करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल
द्विवेदी यांच्याहस्ते वृक्षदिंडीची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अपर जिल्हाधिकारी बी. के.
इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील
कोरडे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक के. आर. राठोड, वन परिक्षेत्र अधिकारी
एस. आर. नांदूरकर, शिक्षणाधिकारी (माध्य.) अशोक गिरी, शिक्षणाधिकारी (प्राथ.)
अंबादास पेंदोर, स्काऊट अॅण्ड गाईडचे श्री. गावंडे, नोडल अधिकारी तात्या नवघरे यांच्यासह
शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
जिल्हाधिकारी
कार्यालय परिसरातून वृक्षदिंडीला प्रारंभ झाला. यावेळी लोकशाहीर अंबादास पवार व
मालेगाव येथील शिवाजी महाराज नवघरे यांच्या भजनी मंडळाने शाहिरी व भजनातून झाडांचे
महत्त्व विषद केले. तसेच दिनांक १ जुलै २०१६ रोजी प्रत्येकाने व्यक्तीने किमान एक
तरी झाड लावून आपल्या वसुंधरेचे रक्षण करण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी
कार्यालयापासून निघालेली वृक्षदिंडी अकोला नाका, पाटणी चौक, शिवाजी चौक, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर या वृक्षदिंडीचा
समारोप झाला. या वृक्षदिंडीमध्ये शिवाजी हायस्कूल, बाकलीवाल विद्यालय, राणी
लक्ष्मीबाई कन्या शाळा, सुशीलाबाई जाधव विद्या निकेतन, रेखाताई कन्या शाळा, जिल्हा
परिषद हायस्कूल, एस. एम.सी हायस्कूल, समर्थ विद्यालय व मालतीबाई सरनाईक कन्या शाळामधील
विद्यार्थी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी,
मुख्य कार्यकारी अधिकारी बनले टाळकरी
वृक्षारोपणाविषयी
जनजागृती करण्यासाठी आयोजित वृक्षदिंडीमध्ये अभंग, भजनाच्या माध्यमातून झाडांचे महत्त्व
पटवून देण्यात आले व वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले. या दिंडीमध्ये जिल्हाधिकारी
राहुल द्विवेदी हे स्वतः वीणा घेऊन सहभागी झाले, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी गणेश पाटील, अपर जिल्हाधिकारी बी. के. इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी
राजेंद्र देशमुख, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, सामाजिक वनीकरण विभागाचे
उपसंचालक के. आर. राठोड हे अधिकारी हातात टाळ घेऊन वृक्षदिंडीतील भजनामध्ये टाळकरी
बनले होते.
*****
Comments
Post a Comment