एकजूट झालं गाव, साकारला भव्य तलाव !


·         ४४ दिवसांत खोदले ५ कोटी लिटर साठवण क्षमतेचे तळे
·         लोकवर्गणीतून ९५ लक्ष रुपये खर्च
वाशिम जिल्ह्यात असलेल्या तामसी गावातील ग्रामस्थांनी एकजूट होऊन अवघ्या ४४ दिवसांत सुमारे पाच कोटी लिटर क्षमतेच्या तळ्याची निर्मिती केली आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या तामसीकरांनी लोकसहभागातून साकारलेले हे तळे सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. पूर्णतः लोकसहभागातून निर्माण झालेल्या या तळ्यामुळे पुढील वर्षी या गावातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार असून ‘पाणीदार गाव’ अशी तामसीची नवी ओळख निर्माण होणार आहे.
वाशिम शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर तामसी हे साडेतीन हजार लोकवस्ती असलेलं गाव. गत काही वर्षात झालेला अपुरा पाऊस आणि भूजल पातळी खालावल्याने जिल्ह्यातील इतर गावांप्रमाणे या तामसीलाही दुष्काळाचा सामना करावा लागत होता. खरीप हंगामातही शेतीला पुरेसे पाणी न मिळाल्याने उत्पन्नात घट होत होती. त्यामुळे गावातील शेतकरी वर्ग चिंतेत होता. गत पाच वर्षांपासून उन्हाळ्यामध्ये या गावाला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी प्रशासनाला ३-४ विहिरींचे अधिग्रहण करावे लागत होते. तरीही पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकत नसल्याने गावातील महिलांना, मुलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. मात्र यंदा पाण्याच्या समस्येने अधिकच उग्र रूप धारण केले आणि यातूनच एकजूट होऊन या जलसंकटावर मात करण्याचा विचार समोर आला. त्यासाठी गावातील काही मंडळींनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. प्रत्येकाच्या घरी जाऊन चर्चा करण्यात आली. गावातील प्रतिष्ठीत मंडळी, नेते मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये बैठकांवर बैठका झाल्या. अखेर गावाच्या पूर्वेला असलेल्या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या ई-क्लास जागेवर तळे खोदण्याच्या निर्णय एकमताने घेण्यात आला. याकामी  गावातील प्रत्येकाने सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या ग्रामस्थांनी गावाला ‘पाणीदार’ बनविण्यासाठी एकजूट दाखवली. सगळा गाव एकदिलाने उभा राहिला. ज्या ठिकाणी तळे खोदण्याचे निश्चित झाले होते, त्या ई-क्लास जागेवर असलेले अतिक्रमणही संबंधितांनी स्वतःहून काढून घेतले आणि तळे निर्मितीच्या कामाचा मार्ग मोकळा झाला.
१६ जानेवारी २०१६ रोजी तळ्याच्या कामाचे भूमिपूजन झाले आणि १७ जानेवारी २०१६ रोजी प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात झाली. पहिल्या दिवसापासूनच रोज गावातील सुमारे ३०० लोकांनी श्रमदानास सुरुवात केली. सुमारे २५० फुट लांब व तितक्याच रुंदीचे तळे खोदण्याच्या काम वेगाने सुरु झाले. काळ्या मातीचा पाच ते सहा फुट जाडीच्या थराचे खोदकाम झाल्यानंतर मुरूम व कठीण खडक लागल्याने खोदकामासाठी मशीनची आवश्यकता जाणवू लागली. मात्र त्यासाठी पैसा कसा उभारणार? हा प्रश्न निर्माण झाला. सुरुवातीला गावातील २० शेतकरी गटांकडून वर्गणी जमा करण्यात आली आणि काम सुरु झाले. त्यानंतर गावामध्ये हनुमान मंदिर उभारण्यासाठी जमा करण्यात आलेली साडेतीन लाख रुपये लोकवर्गणी तळ्याच्या निर्मितीसाठी वापरण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला.  जमा झालेल्या लोकवर्गणीतून दोन जेसीबी मशीन, एक टूटेन मशीन व सहा टिपरच्या सहाय्याने खोदकामास सुरुवात झाली.
पाणी टंचाईमुळे होणारी पायपीट थांबविणे व भविष्यातील जलसंकटावर मात करायची असेल तर हे तळे पूर्ण होणे गरजेचे असल्याची जाणीव प्रत्येक तामसीकराला झाली होती. कामाची व्याप्ती आणि पाण्याचे महत्त्व लक्षात आल्याने लोकवर्गणीचा ओघ वाढतच गेला. प्रत्येकाने आपल्या ऐपतीनुसार पैसे जमा केले. लहान मुलांनी आपल्या खाऊचे, तर युवकांनी आपल्या मोबाईल रिचार्जचे पैसे लोकवर्गणीसाठी दिले. विशेष म्हणजे गावातील काही महिलांनी
आपल्या मंगळसूत्रातील सोन्याचे मनी वर्गणी म्हणून सुपूर्द केले. बघता-बघता सुमारे ९५ लाख रुपये लोकवर्गणी जमा झाली. तळे खोदण्यासाठी जेसीबी मशीन, टिपर आदीसह तळ्याच्या इनलेट-आऊटलेट व इनलेटच्या बाजूला गॅबीयन बंधाऱ्याच्या बांधकामासाठी हा निधी खर्च झाला. अखेर २५० फुट लांब, २५० रुंद आणि २६ फुट खोल आकाराचे भव्य तळे पूर्णतः लोकसहभागातून साकारण्याची किमया तामसीकरांनी साधली. गाव ‘पाणीदार’ बनविण्यासाठी ग्रामस्थांनी एकदिलाने आणि एकजुटीने केलेले प्रयत्न इतर गावांसाठी प्रेरणादायी व आदर्शवत ठरणारे आहेत.
तळे बनले ‘लोकरंग जलमंदिर’
तामसी येथे तळे निर्मितीमध्ये महत्त्वाचे योगदान देणारे डॉ. सुधीर कव्हर सांगतात की, या तळ्यात जमा होणाऱ्या पाण्यामुळे गावातील पाणी टंचाई दूर होणार आहे. गावकऱ्यांच्या घामातून साकारलेल्या या तळ्याचे पवित्र कायम रहावे आणि त्याचे महत्त्व अधोरेखित व्हावे, यासाठी या तळ्याचे ‘लोकरंग जलमंदिर’ असे नामकरण करण्यात आले आहे. या तळ्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व बगीचा लागवड करून अधिक सुशोभित करण्यात येणार आहे. तसेच तारचे कुंपण व दगडाचे पिचिंग करण्यात येत असून या तळ्याला पर्यटन स्थळाचे स्वरूप देण्यात येणार आहे.
डॉ. राजेंद्रसिंह, जिल्हाधिकारी यांच्याकडून शाब्बासकी!
प्रख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह ८ मार्च २०१६ रोजी शासकीय कार्यक्रमानिमित्त वाशिम येथे आले होते. यावेळी त्यांना तामसी येथे लोकसहभागातून साकारलेल्या तळ्याची माहिती मिळताच त्यांनी तामसी येथे जाऊन तळ्याची पाहणी केली व तामसीकरांचे कौतुक केले. वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही तामसी ग्रामस्थांच्या कामाचे कौतुक करत इतर गावांनीही तामसी गावाचा आदर्श घेण्याचे आवाहन केले आहे. डॉ. राजेंद्रसिंह व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची शाब्बासकीची थाप पाठीवर पडल्याने तामसी येथील ग्रामस्थांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. गावात २२५ फुट बाय २२५ फुट आकाराचे आणि २० फुट खोलीचे सुमारे तीन कोटी लिटर साठवण क्षमता असलेले आणखी एक तळे खोदण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला असून या तळ्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली असल्याचे येथील डॉ. सुधीर कव्हर यांनी सांगितले.
तामसीचे शिवार होणार ‘जलयुक्त’
भव्य तळ्याची निर्मित करत असताना गावाने दाखविलेली एकजूट आणि सातत्याने पाण्याविषयी होणारी चर्चा यामुळे संपूर्ण तामसी गाव जलसाक्षर बनले आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीला पाण्याचे महत्त्व समजले आहे. राज्य शासनामार्फत सुरु करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानात सन २०१६-१७ करिता तामसी गावाचा समावेश करण्यात आला आहे. या अभियातील प्रत्येक काम स्वतः सहभागी होऊन पूर्ण करून घेण्याचा निर्धार तामसीकरांनी केला आहे. जलयुक्त शिवार अभियानाची कामे पूर्ण झाल्यानंतर तामसीचे संपूर्ण शिवार ‘जलयुक्त’ बनणार आहे.

******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे