खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू

 

·         जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन 

वाशिम, दि. ०१ (जिमाका) : खरीप हंगाम २०२१ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक असून खरीप हंगाम २०२१ करिता योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक १५ जुलै २०२१ पर्यंत आहे. वाशिम जिल्ह्यातील ज्वारी, सोयाबीन, मुग, उडीद, तूर, कापूस या पिकांचा समावेश प्रधानमंत्री पीक विमा योजनेत असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.

 या योजनेंतर्गत खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधिसुचित मुख्य पिकांची अधिसुचित क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी, लावणी न झाल्यास विमा संरक्षण देय राहील. तसेच सर्वसाधारण काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर अधिसुचित क्षेत्रस्तरावर विमा संरक्षण देय राहील. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाईल. अधिसुचितविमा क्षेत्र घटकातील पिक कापणी प्रयोगावरुन उपलब्ध झालेल्या सरासरी उत्पन्नाची तुलना उंबरठा उत्पन्नाशी करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाईल. जर सरासरी उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी आले तर नुकसान भरपाई देय होईल.

 स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी, विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आगया स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकाचे ठरावीक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिकस्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येईल. काढणी पश्चात नुकसानामध्ये ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधुन सुकवणी करणे आवश्यक असते अशा कापणी, काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकाचेकाढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत (१४ दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांचे अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाईल.

 काढणी पश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती या जोखिमे अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबरनुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत ‘क्रॉप इंश्युरंन्स ॲप’ किंवा  संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक अथवा बँक वा कृषि व महसूल विभाग यांना कळवावे. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक आहे. वाशिम जिल्ह्यासाठी रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि. (टोल फ्री क्र. १८००१०२४०८८) या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

 बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळणेस्तव विहित मुदतीपुर्वी नजीकचे बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा अथवा न होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकरी योजनेत सहभाग नोंदविण्यास इच्छुक नसेल तर तसे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदरपर्यंत देणे आवश्यक आहे. जे शेतकरी योजनेत सहभागी न होणे बाबत घोषणापत्र देणार नाहीत, त्या सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता कपात करून योजनेत सहभागी करुन घेणेबाबत बँकेमार्फत कार्यवाही केली जाईल.

 योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विमा कंपनी शेतकरी विमा हप्ता आणि केंद्र व राज्य शासनाकडून विमा अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त झाल्यानंतर पिक पेरणी,  लावणीपुर्व नुकसान भरपाई, हंगामामध्ये प्रतिकुल परिस्थितीमुळे झालेले नुकसान, स्थानिक आपत्ती या जोखिमींच्या बाबींकरीता नुकसान भरपाईची पुर्तता करतील. त्याचप्रमाणे उत्पन्नाच्या आकडेवारीवर आधारित व काढणी पश्चात नुकसान भरपाई या जोखिमीच्या बाबींकरीता नुकसान भरपाईची पुर्तता केंद्र व राज्य शासनाकडून विमा अनुदान अंतिम हप्ता प्राप्त झाल्यानंतर करतील.

 विमा योजनेतंर्गत विविध जोखिमीतंर्गत निश्चित होणारे नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेच्या अटी व शर्तीच्या आधिन राहून निश्चित केले जाते. हंगामात घेण्यात आलेल्या पिक कापणी प्रयोगातून प्राप्त होणाऱ्या सरासरी उत्पन्नाची तुलना ही उंबरठा उत्पन्नाशी करुन हंगामाच्या शेवटी नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते. योजनेतील सहभागासाठी तात्काळ नजीकच्या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँक, आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.

 पीकनिहाय शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता (कंसात विमा संरक्षित रक्कम)

ज्वारी : शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता- रु. ५०० (विमा संरक्षित रक्कम- २५,०००/-)

सोयाबीन : शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता- रु. ९०० (विमा संरक्षित रक्कम- ४५,०००/-)

मुग : शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता- रु. ३८० (विमा संरक्षित रक्कम- १९,०००/-)

उडीद : शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता- रु. ३८० (विमा संरक्षित रक्कम- १९,०००/-)

तूर : शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता- रु. ६३० (विमा संरक्षित रक्कम- ३१,५००/-)

कापूस : शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता- रु. १२५० (विमा संरक्षित रक्कम- ४३,०००/-)

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे