बेरोजगार युवक-युवतींच्या मदतीसाठी मार्गदर्शन तथा समुपदेशन कक्ष - पालकमंत्री शंभूराज देसाई
वाशिम , दि. २९ (जिमाका) : लॉकडाऊन काळात जिल्ह्यात परतलेल्या बांधवांना त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यानुसार खासगी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींची माहिती मिळणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन केंद्राच्यावतीने तयार केलेल्या ‘ गुगल फॉर्म ’ आणि व्यवसाय मार्गदर्शन तथा समुपदेश कक्षाची मदत होईल , असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन केंद्राच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘ गुगल फॉर्म ’ आणि व्यवसाय मार्गदर्शन तथा समुपदेश कक्षाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे , आमदार राजेंद्र पाटणी , आमदार अमित झनक , जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना , पोलीस अधीक्षक वसंत परदेशी , जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले , लॉकडाऊन काळात जिल्ह्यात परतलेल्या युवक-युवतींचा रोजगार व स्वयं...