शिवार झाले जलयुक्त, बळीराजा झाला चिंतामुक्त
जलयुक्त शिवार यशोगाथा... खरीप हंगामातील उत्पन्नात भरघोस वाढ रब्बी हंगामातही मिळणार पिकांना आधार अभियानामुळे फायदा झाल्याने शेतकरी समाधानी राज्य शासनाने हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे निर्माण झालेल्या संरक्षित पाणी साठ्यांमुळे वाशिम सारख्या कोरडवाहू जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही चांगला फायदा झाला आहे. रिसोड तालुक्यातील बाळखेड व मोठेगाव येथील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन व तुरीच्या पेरण्या आटोपल्यानंतर पावसाने सलग ४० ते ४१ दिवस पाठ फिरवली होती. या काळात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत निर्माण झालेल्या पाणीसाठ्याचा वापर करूनच शेतकऱ्यांनी आपली पीके वाचविली. इतकेच नव्हे तर जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या कामांमुळे सोयाबीन पिकाला पुरेसे पाणी मिळाल्यामुळे यंदा अधिक उत्पन्न मिळाल्यामुळे येथील शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होत असून आपले शिवार जलयुक्त झाल्यामुळे हे शेतकरी चिंतामुक्त झाले असल्याचे दिसत आहेत. राज्य शासनाच्या वर्षपुर्तीनिमित्त आयोजित पत्रकार दौऱ्याच्यानिमित्ताने बाळखेड व मोठेगावमध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेली शेतीची कामे पाहण्याची संधी मिळाली....