खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू
· जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन वाशिम , दि. ०१ (जिमाका) : खरीप हंगाम २०२१ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक असून खरीप हंगाम २०२१ करिता योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक १५ जुलै २०२१ पर्यंत आहे. वाशिम जिल्ह्यातील ज्वारी, सोयाबीन, मुग, उडीद, तूर, कापूस या पिकांचा समावेश प्रधानमंत्री पीक विमा योजनेत असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत खरीप हंगामातील अपुरा पाऊस , हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधिसुचित मुख्य पिकांची अधिसुचित क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी, लावणी न झाल्यास विमा संरक्षण देय राहील. तसेच सर्वसाधारण काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत पूर , पावसातील खंड , दुष्काळ इ. बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पाद...